Fri, Jul 10, 2020 22:23होमपेज › Nashik › डस्टबिन’ घोटाळ्याची  महापौर करणार चौकशी

डस्टबिन’ घोटाळ्याची  महापौर करणार चौकशी

Published On: Dec 14 2017 2:53AM | Last Updated: Dec 14 2017 2:46AM

बुकमार्क करा

 नाशिक : प्रतिनिधी

आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या डस्टबिन प्रकरणाची महापौर रंजना भानसी यांनी तत्काळ दखल घेत खरेदीची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी चर्चा करून संबंधित विषय महासभेवर मान्यतेसाठी सादर का करण्यात आला नाही याचा जाब विचारला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.  स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य विभागाने 21 लाख रुपयांचे 189 डस्टबिन खरेदी केले आहे. एका डस्टबिनची किंमत 11,121 रुपये इतकी आहे. प्रशासनाने महासभेवर खरेदीचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर न करता आयुक्तांच्या अधिकारात ही खरेदी केली आहे. त्यासाठी ई-टेंडरिंग पद्धतीने निविदा मागविण्यात आल्या होत्या.

त्यात तीन कंपन्यांकडून दरपत्रक मागविण्यात येऊन कमीत कमी दराने स्टोअरवेल नामक डस्टबिनची खरेदी केली आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी याच प्रकरणी मनपा प्रशासन तसेच सत्तारूढ पक्षावर आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. बाजारात याच प्रकारच्या डस्टबिनची बाजारभावानुसार अडीच ते तीन हजार इतकी किंमत आहे. असे असताना 11 हजार रुपयांना केलेली खरेदी संशयास्पद असून, याबाबत संबंधित अधिकार्‍यांनी गैरप्रकार केल्याचे त्यांनी सांगितले होते. मंगळवारी (दि.13) महापौर रंजना भानसी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा करत दखल घेतली आहे. महापौर आयुक्तांची भेट घेऊन याबाबतची विचारणा करत महासभेवर प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर न करण्याचे कारण काय असा प्रश्‍न करणार आहे.