Fri, Jul 10, 2020 22:11होमपेज › Nashik › जिल्हाधिकारी कार्यालयातही  ‘आधार’साठी फरपट 

जिल्हाधिकारी कार्यालयातही  ‘आधार’साठी फरपट 

Published On: Dec 14 2017 2:53AM | Last Updated: Dec 14 2017 2:41AM

बुकमार्क करा

नाशिक ः विशेष प्रतिनिधी

बँक, शासकीय कार्यालये असोत, की शाळा-महाविद्यालये. सर्वत्र आधार कार्डची सक्ती केली जात आहे. मात्र आधार नोंदणीसाठी नागरिकांची होणारी परवड लक्षात घेऊन नव्याने आधार केंद्रे शहरात सुरू करण्यात आली आहेत. त्यातील तीन केंद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असून ती गेल्या दोन दिवसापासून तांत्रिक कारणामुळे बंद असल्याने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच नागरिकांची परवड होत असल्याचे वास्तव आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या तिन्ही आधारकेंद्रावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तात्पुरते बंद करण्यात आले असल्याचा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आधारकेंद्र बंद का आहे याची माहिती अधिकार्‍यांकडून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. जिल्ह्यात सन 2011 च्या जनगणनेनुसार असलेल्या 61 लाख 7 हजार 187 या लोकसंख्येनुसार 101.73 टक्के आधार नोंदणी प्रत्यक्षात झाली आहे. 

मात्र डिसेंबर 2015 च्या लोकसंख्येनुसार आजही 2 लाख 47 हजार 444 नागरिक आधारकार्डविना असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. आधार कार्ड  आहे पण अनेकांना आधारमधील दुरुस्त्यांसाठी धावपळ करावी लागत आहे. खासगी आधार नोंदणी केंद्रे बंद झाल्यामुळे आधार यंत्रणेवरील ताण वाढला आहे. सरकारी कार्यालये, शाळा व काही ठिकाणी आधारची कामे होत असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत असले, तरी नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने हा दावा फोल आहे.