Fri, Jul 10, 2020 23:12होमपेज › Nashik › ‘स्वच्छ सर्वेक्षणा’च्या आढाव्यात नाशिक मनपा २१ व्या स्थानी 

‘स्वच्छ सर्वेक्षणा’च्या आढाव्यात नाशिक मनपा २१ व्या स्थानी 

Published On: Dec 14 2017 2:53AM | Last Updated: Dec 14 2017 2:51AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंत्रालयात बुधवारी (दि.13) स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील 13 महापालिकांचा आढावा घेण्यात आला. त्यात 500 अमृत योजनेत समाविष्ट असलेल्या 500 शहरांमध्ये नाशिक महापालिका 21 व्या स्थानी असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे जानेवारी महिन्यात होणार्‍या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने नाशिक महापालिकेची जबाबदारी आणखी वाढली आहे.

मंत्रालयातील नगररचना विभागात प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी महाराष्ट्रातील महापालिकांकडून स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने सुरू असलेली तयारी व नियोजनाचा आढावा घेतला. बैठकीला नाशिक मनपासह पुणे, सातारा, सांगली, लातूर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, धुळे या महापालिकांचे आयुक्त, आरोग्य अधिकार्‍यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी संबंधित सर्व मनपाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना व कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले. नाशिक मनपाकडून स्वच्छ सर्वेक्षणासाठी कचरा संकलन, शहरात विविध ठिकाणी डस्टबिन बसविणे, खत उत्पादन, वेस्ट टू एनर्जी, सुलभ शौचालयांची दुरुस्ती व स्वच्छता, वैयक्तिक शौचालये, स्मार्ट स्वच्छता अ‍ॅप, विभागीय स्वच्छता निरीक्षकांना ई-लर्निंग प्रशिक्षण, नागरिकांसाठी पेट्रोलपंपांवरील स्वच्छतागृहांचा वापर करू

देण्यासाठी अधिसूचना, शाळा व रुग्णालयांसाठी स्वच्छता स्पर्धा, स्वच्छतादूतांमार्फत जागृती, फलक व बॅनर्स यासह विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात अमृत योजनेत समाविष्ट असलेल्या देशातील 500 शहरांबरोबर मनपाची स्पर्धा आहे. सध्याच्या गुणक्रमवारीत नाशिक मनपाने केलेल्या उपाययोजनेनुसार नाशिकचे स्थान पहिल्या 50 शहरात 21 व्या स्थानी आहे. तर या 50 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 20 शहरांचा समावेश आहे. पुढील महिन्यात स्वच्छ सर्वेक्षण केले जाणार आहे. तत्पूर्वीच नाशिकसाठी केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरत असून, त्यात आणखी वाढ करून तसेच वेग साधून पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी मनपाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बैठकीस नाशिक मनपाचे आयुक्त अभिषेक कृष्णा, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे उपस्थित होते.