Mon, Nov 18, 2019 21:23होमपेज › Nashik › विधान परिषद निवडणूक : दोन दिवसांत भाजपाची भूमिका होणार स्पष्ट 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सारेच गॅसवर

Published On: May 17 2018 1:26AM | Last Updated: May 16 2018 11:46PMनाशिक : प्रतिनिधी

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना दिलेल्या उमेदवारीवरून संतापलेल्या भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून, विधान परिषदेच्या स्थानिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची, हे येत्या शनिवार (दि.19) पर्यंत गुलदस्त्यात ठेवली आहे. शिवसेनेने दिलगिरी व्यक्त केल्यास भाजपाकडून युतीचा धर्म पाळला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर काही दिवसांतच विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे भाजपाने सावध पवित्रा घेत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली होती.  त्याचदरम्यान परवेझ कोकणी यांनी अपक्ष उमेदवारी कायम  ठेवल्याने भाजपाच्या भूमिकेबद्दल संशय घेतला गेला. मालेगाव मेळाव्यानिमित्त आलेल्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र ही शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सेनेने वनगा यांना उमेदवारी दिल्याने भाजपाच्या संतापात भर पडली. सेनेने उमेदवार माघारी घेऊन भाजपाला पाठिंबा द्यावा, अशी त्या पक्षाच्या नेत्यांची अपेक्षा होती.

त्याचमुळे भाजपेयींनी माघारीच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा केली. पण, वनगा यांची उमेदवारी कायम असल्याने विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपेयींची भूमिका महत्वाची ठरली. या सार्‍या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह महापालिका,नगरपालिका, नगर परिषदेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बुधवारी बैठक झाली. यावेळी सेनेने आतापर्यंत घेतलेल्या भूमिकेवर कडाडून विरोध दर्शविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनीही सर्वांचेच ऐकूून घेऊन या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची हे ठरविण्यासाठी येत्या शनिवार (दि.19)पर्यंत प्रतीक्षा करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. विशेष म्हणजे याच दिवशी प्रचाराची सांगता होणार आहे.

सेनेने दिलगिरी व्यक्त केल्यास आपली  मते दराडे यांच्या पाठिशी उभी करण्याची तयारी भाजपाने केली आहे. त्यामुळेच  शनिवारपर्यंत प्रतीक्षा करण्याची धोरण भाजपाचे स्वीकारले आहे. सेना आपल्या पवित्र्यावर ठाम राहिल्यास कोकणी यांना पाठिंबा देण्याचाही विचार केला जात आहे. आणखी एक सेनेला शह देण्यासाठी या निवडणुकीत भाजपा तटस्थ राहण्याची भूमिका घेऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

पालघरवरून सेना-भाजपात वितुष्ट

सेना-भाजपा युतीत पालघरच्या जागेवरून वितुष्ट निर्माण झाले. तोपर्यंत विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या सहापैकी तीन-तीन जागा वाटून घेण्यात आल्या होत्या. त्यामुळेच भाजपाने नाशिकमध्ये फारसे लक्ष घातले नव्हते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. युतीतील याच वितुष्टाचा फायदा उचलण्याची तयारी काँग्रेस आघाडीने केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही भाजपाची भुमिका स्पष्ट न झाल्याने सेना, काँग्रेस आघाडी आणि अपक्ष हे तिन्हीही उमेदवार गॅसवर आहे. ऐनवेळी पाठिंबा दिल्यास तयारी करणार कशी, असा प्रश्‍न अपक्षासमोर आहे.