Fri, May 29, 2020 09:17होमपेज › Nashik › स्मार्ट पार्किंगमधून नाशिककरांना ‘चुना’

स्मार्ट पार्किंगमधून नाशिककरांना ‘चुना’

Published On: Jul 05 2019 1:33AM | Last Updated: Jul 04 2019 11:05PM
नाशिक : प्रतिनिधी

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात ऑन स्ट्रीट-ऑफ स्ट्रीट लोकेशन पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली आहे. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीने शहरातील रस्त्यांच्या कडेला चुना मारून स्मार्ट पार्किंग व्यवस्था केली. सुरुवातीस मोफत असलेली ही पार्किंग व्यवस्था आता सशुल्क करून ठेकेदारांचा खिसा भरण्याचा आणि नाशिककरांना चुना लावण्याचाच ‘स्मार्ट’ पर्याय कंपनीने काढल्याची चर्चा आहे. 

नाशिकचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर शहरात अनेक बदल झाले आहेत. मुख्यत: शहराच्या वाहनतळाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी स्मार्ट कंपनीने शहरात 15 ठिकाणी ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट लोकेशन तयार केले. त्यामार्फत 2 हजार 116 दुचाकींसाठी आणि 1 हजार 3 चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा तयार झाली आहे. त्यासाठी स्मार्ट कंपनीने शहरातील प्रशस्त रस्त्यांच्या कडेला चुना मार्किंग करून पार्किंगची सुविधा तयार केली. तर पार्किंगस्थळी किती वाहने उभी राहू शकतील असा डिजिटल फलक प्रत्येक ठिकाणी लावला आहे. काही महिने नाशिककरांना या पार्किंगची मोफत सुविधा भेटली. मात्र, आता स्मार्ट सिटी कंपनीने पार्किंग व्यवस्था आता सशुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठेकेदार नेमून त्यांच्यामार्फत वाहनचालकांकडून शुल्क आकारले जाणार आहेत. यामुळे रस्त्यावर चुन्याने मार्किंग करून त्यास स्मार्ट पार्किंगचे नाव देण्यात आले. त्यामुळे आता कंपनीतर्फे ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठीचे सशुल्क पार्किंगचा खटाटोप सुरु केल्याची चर्चा आहे.