Sun, Jun 07, 2020 11:21होमपेज › Nashik › शिवसेना नेते संजय राऊत यांचा नाशिकमध्ये आरोप

'झेड प्‍लस' सुरक्षेत दुष्‍काळ पाहणीवर शिवसेनेचा हल्‍लाबोल

Published On: Dec 07 2018 4:57PM | Last Updated: Dec 07 2018 4:57PM
नाशिक : प्रतिनिधी

झेड प्लस सुरक्षेमध्ये दुष्काळ पाहणी दौरा होत असेल तर हे शासनाचे सपशेल अपयश आहे. दुष्काळ उपाय योजनांविषयी निव्वळ घोषणा झाल्या मात्र शेतकर्‍यांच्या पदरात काहीच लाभ पडलेला नाही. यावरून जनतेत असंतोष असल्यानेच शासनाला झेड प्लस सुरक्षेची गरज पडल्याचा आरोप शिवसेना खासदार  संजय राऊत यांनी केला.

कांद्यासह अन्य शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. या संतापापोटी लोक शासनाला मनीऑर्डर करून आपल्या भावना कळवत आहेत. परंतु, त्या भावना लक्षात न घेता त्यांनाच दोषी ठरविले जात आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या भावनांचा कडेलोट होण्यापूर्वीच शासनाने अंमलबजावणी करावी, अशी सूचना त्यांनी केली.

महाराष्ट्रात शिवसेनाला चांगले वातावरण आहे. यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेनेचीच सत्ता असेल आणि संपूर्ण मंत्रिमंडळ शिवसेनेचे राहणार असा आत्मविश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीत युती असेल का असा प्रश्‍न विचारला असता हे त्यांनाच ठाऊक. राजकारण आम्हाला कमी आणि त्यांनाच जास्त कळते. २०१४ मध्ये युती मोडणारे २०१९ साठी वारंवार  युतीची भाषा का बोलत आहेत, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. 

राहुरी  येथील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्यावर खासदार राऊत म्हणाले, गडकरी काम जास्त करतात. त्यापेक्षाही जास्त काम आणि विदेश दौरे त्यांचे वरिष्ठ करतात. यामुळे गडकरींनी त्यांच्याकडून आरोग्‍याच्‍या टिप्स्‍ घ्याव्यात, असा सल्ला दिला.

धुळे येथे आठ -आठ दिवस पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. जामनेरला तर १५ दिवसांनी पाणी मिळते. असे अनेक प्रश्‍न असल्याने मंत्र्यांनी काहीतरी बोलण्यापेक्षा तिकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना खासदार राऊत यांनी केली. 

अंनिसने वक्तव्य तपासावे

मुख्यमंत्र्यांच्या अंगात दैवी शक्ती आहे असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले होते. त्यावर महाजन यांनी आरती ओवाळणे बंद करावे, असे सांगितले होते. आता दैवी शक्ती असेल तर त्या जोरावरच जनतेची कामे देखील त्यांनी केली पाहिजे. अशा प्रकारचे बोलणे हे अंधश्रध्देशी संबंधीत असल्याने महाजनांच्या वक्तव्याचा अंधश्रध्दा निर्मुलन समितीने अभ्यास करावा, असे खासदार संजय राऊत म्‍हणाले. 

जानेवारीत नाशिकला महासभा

अयोध्या येथील यशस्वी दौर्‍यानंतर आता महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. पक्षप्रमूख उध्दव ठाकरे त्या अनुषंगाने महाराष्ट्र दौरा करत असून, येत्या २४ डिसेंबरला पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या तीरावर कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्याचबरोबर नाशिकला जानेवारी २०१९ च्या पहिल्या आठवड्यात जाहीर सभा घेतली जाणार आहे. गोदावरी नदीच्या तिरावर देखील शरयु नदी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या धर्तीवर कार्यक्रम होणार असल्याचे माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.