Tue, Jul 14, 2020 03:06होमपेज › Nashik › आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला!

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला!

Last Updated: Nov 17 2019 1:24AM
नाशिक : ज्ञानेश्‍वर वाघ

भाजपाची नाशिक महापालिकेतील सत्तेसाठी पूर्व विधानसभा मतदारसंघातील दोन आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठाच पणाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी बाजी मारत बाळासाहेब सानप यांना धूळ चारली होती. आता महापौर निवडणुकीत नेमके याच मतदारसंघातील भाजपाचे सात ते आठ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागणार असल्याची शक्यता आहे. यामुळे ढिकले संबंधित नगरसेवकांचे मन वळविण्यात यशस्वी होतात की सानप नगरसेवकांना पळविण्यात बाजी मारतात याकडे लक्ष लागून आहे. 

नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक तसे पाहिले तर आता शिवसेना आणि भाजपा या दोघांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. यामुळे साम, दाम, दंड, भेद असे सर्व प्रकार आजमावून पाहिले जाणार आहेत. राज्याच्या घडामोडींमध्ये शिवसेना, दोन्ही काँग्रेस अशी महाशिवआघाडी आकार घेत आहेत. त्याच वळणाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घडामोडी देखील घडत असून, नाशिक महापालिकाही त्याच वळणाने जात आहे. नाशिक महापालिकेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेस आणि मनसे असल्याचे शिवसेनेकडून बोलले जात असले तरी त्याव्यतिरिक्‍त आणखी लागणार्‍या संख्याबळाची रसद मात्र भाजपाकडूनच घ्यावी लागणार आहे. त्यासाठी महत्त्वाची भूमिका माजी आमदार बाळासाहेब सानप यांची ठरणार आहे. यामुळेच सहलीला जाण्याच्या पहिल्या दिवसापासूनच सात सानप समर्थक नगरसेवक भाजपाच्या गळाला लागलेले नाहीत. संबंधितांनी सहलीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट सांगितल्याने त्यांचा रोखही भाजपाने लक्षात घेऊन पुढील रणनीती आखणे सुरू केले आहे. नेमके फुटण्याची शक्यता असलेले नगरसेवक हे पूर्व विधानसभा मतदारसंघातील असल्याने हा मुद्दा आता दोन्ही आजी-माजी आमदारांसाठी प्रतिष्ठेचा ठरणार आहे.

सात किंवा त्यापेक्षा अधिकचे नगरसेवक शिवसेनेकडे वळविण्यात यश आले तर माजी आमदार बाळासाहेब सानप हे भाजपाकडून उमेदवारी डावलण्याच्या निर्णयाचा वचपा काढू शकतात. याशिवाय सानप यांना शिवसेनेने नियुक्‍त विधान परिषद सदस्यत्वाचे इनामदेखील नाशिक महापालिकेच्या बदल्यात मिळू शकते. यामुळे ते हमखास शिवसेनेच्या दारी आपले समर्थक हजर करू शकतात हे मात्र नक्‍की!  विधानसभेत सानप यांचा पराभव करून भाजपाच्या गोटात आमदारकी म्हणून थाप पटकावल्यानंतर अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्या द‍ृष्टीने महापौरपदाची निवडणूकही महत्त्वाची आहे. कारण त्यांच्याच मतदारसंघातील भाजपाचेच नगरसेवक फुटणार म्हटल्यावर त्यांनाही ही सर्व जुळवाजुळव करून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. यामुळे संबंधित सात ते आठ नगरसेवकांचे मन वळविण्यासाठी आणि राजकीय गणिते जमवून आणण्यासाठी ढिकले यांचे प्रयत्न कितपत पुरेसे पडतात यावरच भाजपाची मदार अवलंबून आहे.