Fri, Jun 05, 2020 17:58होमपेज › Nashik › 'परिवहन'च्या बसमधूनच अवैध दारू वाहतूक; चालकच गुन्हेगार

'परिवहन'च्या बसमधूनच अवैध दारू वाहतूक; चालकच गुन्हेगार

Published On: Mar 27 2019 5:08PM | Last Updated: Mar 27 2019 5:08PM
मालेगाव : वार्ताहर

गुजरात राज्यात दारु बंदी असताना देखील सरकारी कर्मचारीच दारु वाहतूक करताना सापडला आहे. गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून अवैद्यरित्या चोरट्या पध्दतीने विदेशी दारु घेऊन जाणार्‍या बसचालकास पोलिस पथकाने ताब्यात घेतले. छावणी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने केलेल्या कारवाईत चालकाकडून १२ हजार ८२० रुपये किंमतीची विदेशी दारु जप्त करण्यात आली.

गुजरात राज्यात दारु बंदी आहे. या राज्यात चढ्या भावाने दारु विक्री होत असल्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या दारुची वाहतूक होत असते. अशाच पध्दतीने मालेगाव शहरातून गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून विदेशी दारुची विनापरवाना चोरट्या पध्दतीने वाहतूक होणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली होती. 

मिळालेल्‍या माहितीनुसार या पथकाने मंगळवारी (दि.२६) दुपारी तीनच्‍या सुमारास मालेगाव सटाणा रस्त्यावरील वैद्य हॉस्पिटलजवळ सापळा रचला. यावेळी गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या मालेगाव-सुरत बसला (क्रमांक जी.जे.१८ झेड ४५५६) थांबवण्यात आले. या बसची कसून तपासणी केली असता बसच्या बॅटरी बॉक्समध्ये एका हिरव्या रंगाच्या कापडी पिशवीत पेपरच्या कागदात १० विदेशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या. या विदेशी बाटल्यांबाबत बसचालक व वाहकांकडे चौकशी केली असता बसचालक गोविंद शामराव वानखेडे (रा. भोपलगाव ता. दासतोई जि. अहमदाबाद) याने विदेशी दारूच्या बाटल्या विकत घेतल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित हगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रवीण वाडीले यांच्या सुचनेनुसार छावणी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राहूल पाटील, पोलिस शिपाई नरेंद्रकुमार कोळी, पंकज भोये, संदीप राठोड यांनी ही कारवाई केली.