होमपेज › Nashik › फटका कोणाला, फायदा कोणाचा?

फटका कोणाला, फायदा कोणाचा?

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 16 2018 11:36PM-हर्षवर्धन बोर्‍हाडे

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. शिक्षक मतदारांकडून काही दिवसांतच या मतदारसंघातील आठवा आमदार निवडून दिला जाणार आहे. गुरुजींच्या या निवडणुकीत राजकीय पक्षांनीही उडी घेतल्याने रस्सीखेच वाढली आहे. 

या मतदारसंघावर पहिले आमदार एम. आर. चौधरी यांच्यापासून शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) या शिक्षक संघटनेचे प्राबल्य राहिले आहे. त्या काळात नाशिक विभागाला कोकणही जोडण्यात आले होते. मात्र, 1988 पासून हे दोन्ही विभाग वेगवेगळे करण्यात आले व नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदुरबार हा पाच जिल्ह्यांचा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. टीडीएफनंतर माजी आमदार हरिभाऊ शिंदे यांच्या रूपाने शिक्षक परिषदेला या मतदारसंघात खाते उघडता आले होते. एम. आर. चौधरी, हरिभाऊ शिंदे, टी. एफ. पवार, जयवंत ठाकरे, नानासाहेब बोरस्ते, दिलीप सोनवणे, अपूर्व हिरे यांनी आजवर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. राजकारण्यांना अन्य ठिकाणी अपयश आल्यास ते राजकीय पुनर्वसनासाठी शिक्षक मतदारसंघ निवडतात. अपूर्व हिरे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. यावेळीही आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी याच कारणावरून हा मतदार संघ निवडल्याचे बोलले जात आहे. 

या मतदारसंघावर सर्वाधिक प्राबल्य राहिलेल्या शिक्षक लोकशाही आघाडीत फूट पडली आहे. सहा महिन्यांपूर्वी पुणे येथे झालेल्या सभेत इच्छुकांचे उमेदवारावर एकमत होऊ शकले नाही. सभेत खडाजंगी होऊ नये यासाठी तेव्हा चक्क बाउन्सरची खासगी सुरक्षा बोलवावी लागली होती. मात्र, तेव्हा पडलेल्या फुटीमुळे धुळ्याचे संदीप बेडसे, नगरचे भाऊसाहेब कचरे-पाटील, अमृतराव शिंदे, जळगावचे शाळिग्राम भिरुड यांनी वेगळी चूल मांडली व ते सारे निवडणुकीला उभे राहिले. भाऊसाहेब कचरे व संदीप बेडसे यांनी आपलीच टीडीएफ खरी असल्याचा दावा केला आहे. टीडीएफच्या जुन्या फळीने छगन भुजबळ यांचे माजी स्वीय सहायक असलेल्या बेडसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ गळ्यात घातली व त्यावरून संघटनेत फूट पडली. सर्वांनीच आपापल्या प्रचारपत्रकांवर टीडीएफचा उमेदवार असा उल्लेख केल्याने शिक्षक बांधव संभ्रमात असून, शिक्षक लोकशाही आघाडीला मतविभागणीचा तोटा सहन करावा लागणार आहे. 

भाजपाने अनिकेत पाटील यांच्या रूपाने या मतदारसंघात नवा चेहरा दिला असला, तरी त्यांचे वडील तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या रूपाने त्यांना काँग्रेसची पार्श्‍वभूमी आहे. शिक्षणसंस्था संचालकांच्या सर्वपक्षीय संघटनेवर काँग्रेसचे प्राबल्य असले, तरी या निवडणुकीत मात्र प्रादेशिक अस्मिता बळावलेली आहे. म्हणून या संघटनेतील काही नेते विखुरलेले दिसून येत आहेत, तर काही तटस्थ आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतरही भाजपाला माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना थांबवता न आल्याने त्यांच्या उमेदवारीने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. भाजपा व शिक्षक परिषदेच्या वैचारिक भूमिकेत साम्य आहे. त्यामुळे शिक्षक परिषदेचे नगर येथील उमेदवार सुनील पंडित यांच्यामुळेही भाजपाला मतविभागणीचा फटका सहन करावा लागणार आहे.

भाजपाने प्रतापदादा सोनवणे यांना तापी खोरे महामंडळाचे अध्यक्षपद दिले असते, तर सोनवणे निवडणुकीत उतरले नसते, अशी चर्चा आहे.  गेल्या वेळी या निवडणुकीत ‘लक्ष्मीदर्शन’ चांगलेच गाजले होते. यंदाही काही उमेदवारांमुळे शिक्षक मंडळींची चंगळ होत आहे. हॉटेल्स व मंगल कार्यालयांत शिक्षक बांधवांच्या पंगती झडत आहेत. मात्र, त्याचा मतदानावर किती सकारात्मक परिणाम होईल, हे निकालातूनच स्पष्ट होईल. अपूर्व हिरे यांचा अपवादवगळता शिक्षक असणारा उमेदवारच निवडून आला आहे. शिक्षकच शिक्षकांचे प्रश्‍न पोटतिडकीने मांडू शकतो, अशी शिक्षकांची भावना आहे.  रखडलेली शिक्षक भरती, पेन्शनचा प्रश्‍न, घटत्या शाळांच्या तुकड्या, अतिरिक्त कामाचा ताण, वेतनेतर अनुदान, शिक्षणातील गुणवत्ता, डीएड-बीएड शिक्षकांवर कोसळलेली बेकारीची कुर्‍हाड हे शिक्षण क्षेत्रातील सध्याचे कळीचे प्रश्‍न आहेत. ते सोडविण्यास प्राधान्य देणार्‍या उमेदवाराचीच मतदार निवड करतील, असे चित्र आहे.