Mon, Jan 25, 2021 15:19होमपेज › Nashik › शासकीय कामात अडथळा प्रकरणी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्‍हा

शासकीय कामात अडथळा प्रकरणी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्‍हा

Published On: Dec 14 2018 6:00PM | Last Updated: Dec 14 2018 2:02PM

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक रोड टोइंग मोहीम सुरू असताना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला मोहीम थांबवत हुज्जत घातल्या प्रकरणी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर वाहतूक शाखा युनिट चारचे कर्मचारी विलास सन्तु कोटमे यांनी पोलिस ठाण्यात याबाबतीत  तक्रार दाखल केली आहे. या  तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवार( दि.१३) रोजी ते व काही कर्मचारी बिटको चौक ते नाशिक रोड पोलिस ठाण्यापर्यंत चारचाकी वाहन घेऊन टोइंग मोहीम राबवित होते.  

शिवसेनेचे पूर्व विधानसभा प्रमुख नितीन चिडे, युवा सेना उपमहानगर प्रमुख समर्थ मुठाल हे काही कार्यकर्त्यांसह  याठिकाणी आले. चारचाकी वाहनात भरलेली दुचाकी वाहने सोडून द्या,  दुचाकी चालकांना तुम्ही दंड भरू नका, असे सांगत पोलिस कर्मचार्‍यांशी हुज्जत घालीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. कोटमे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्ग दर्शनाखाली नाशिक रोड पोलिस करत आहेत