Wed, Jun 03, 2020 21:42होमपेज › Nashik › नाशिक : खासदारांच्‍या समजुतीनंतरही मालगव्हाण ग्रामस्‍थांचा मतदानांवर बहिष्‍कार

'या' गावात मतदान झालेच नाही

Published On: Apr 29 2019 7:22PM | Last Updated: Apr 29 2019 6:19PM
कळवण : प्रतिनिधी

राजकारणाची खरी सुरुवात ही जन्मगाव प्रतापगड व मालगव्हाण येथून झाली आहे. मी अजूनही धडधाकट असून काळजी करण्याचे कारण नाही. उमेदवारी न मिळाल्याने तुम्हा सर्वांची नाराजी मी समजू शकतो. मात्र त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकणे योग्य नाही. मालगव्हाण हे सुशिक्षित गाव आहे. वाटेल त्याला मत द्या. पण मतदानाचा हक्क सोडता कामा नये. अशी समजूत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी काढूनही मालगव्हाण ग्रामस्थांनी त्यांच्या निर्णयाशी ठाम राहत मतदान न करण्याचा पवित्रा कायम ठेवल्याने याठिकाणी एकही मतदान होऊ शकले नाही. 

तालुक्याच्या इतिहासात मतदानावर बहिष्कार टाकण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. याठिकाणी पुरुष ३०३ तर महिला ३०७ असे एकूण ६१० मतदार आहेत. आज दुपारी खासदार चव्हाण यांनी प्रतापगड येथे जाऊन मतदान केले. त्यानंतर त्यांनी मालगव्हाण येथे भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करत मतदान करण्याची विनंती केली. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की तुम्हाला उमेदवारी दिली नाही, त्याची तीव्र नाराजी तर आहेच. पण उमेदवार किंवा उमेदवाराकडून याठिकाणी कुणीही आले नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना पत्रिका सुद्धा देण्यात आल्या नाहीत. व साधी विचारपूस देखील केली नाही. एकप्रकारे आम्हाला वाळीतच टाकले आहे अशी भावना यावेळी मालगव्हाण ग्रामस्थांनी व्यक्त करत तीव्र निषेध व्यक्त करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ठाम असल्याचे सांगितले. बहिष्काराचा निर्णय शेवटपर्यंत राहिल्याने मालगव्हाण केंद्रावर एकही मतदान झाले नाही. 

माझे जन्मगाव प्रतापगड असले तरी राजकारणाची जडणघडण या मालगव्हाणमध्ये झाली आहे. मतदान करण्याचा अधिकार हा सर्वस्वी त्या मतदाराला आहे. बऱ्याच वेळा मुले देखील पालकांचे ऐकत नाहीत. मला येथे माझ्या उमेदवारीच्या बाबतीत रोष दिसला. मी तेंव्हाही विनंती केली. आत्ताही केली. मी त्यांचेवर दबाव आणणार नाही. मतदार कुणीही असो त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मत कुणाला द्यायचे याचे मतस्वातंत्र्य सर्वस्वी त्या मतदाराचे आहे.  ४०- ४२ वर्षांच्या राजकारणात प्रतापगडने जेवढे मोठे केले तेवढेच या मालगव्हाणने केले आहे. मी अजूनही सर्वांच्या साक्षीने त्यांना मतदान करण्याचे जाहीर आवाहन करतो. 
- खासदार हरिश्चंद्र चव्हाण.