Fri, May 29, 2020 09:28होमपेज › Nashik › नाशिक : 22 विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा

नाशिक : 22 विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा

Published On: Jul 07 2019 1:29AM | Last Updated: Jul 06 2019 11:18PM
नगरसूल ः वार्ताहर

येवला तालुक्यातील नगरसूल येथील दादमळा प्राथमिक शाळेतील 22 विद्यार्थ्यांना पोषण आहारातील दुधाद्वारे विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. 6) घडला. 
विद्यार्थ्यांना अल्पोपाहार म्हणून खिचडीसोबत दूधही देण्यात आले. दूध प्यायल्यानंतर मुलांना मळमळू लागले. जीव घाबरू लागला. हे कळताच ग्रामस्थांनी तातडीने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. सर्व विद्यार्थी पहिली ते चौथीत शिकणारे असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना सुटीदरम्यान अल्पोपाहारात दूध व खिचडी देण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी दूध पिताना पहिल्या घोटालाच नाक मुरडले. अनेक मुलांनी तोंडातला तो पहिला घोटही फेकून दिला. पण काहींनी आधी दूध व नंतर खिचडी घेतली. सकाळी नऊनंतरच्या अल्पोपाहारानंतर दूध प्यायलेल्या विद्यार्थ्यांना मळमळत होते. त्यानंतर काहींनी घराचा रस्ता धरला तर काहींनी साडेअकराला शाळा सुटेपर्यंत वाट पाहिली. शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना वाटेत विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या.  दरम्यान, जि. प. सदस्या सविता पवार, बाळासाहेब पवार, कांतिलाल साळवे, सरपंच प्रसाद पाटील, ग्रामविकास अधिकारी गोरख निकम, उमेश देशमुख आदींनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. रुग्णालय प्रशासनाने येवला तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक हिरालाल पाटील यांना घटनेची माहिती दिली आहे. नगरसूल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. सूर्यवंशी, एस. आर. कांबळे, आरोग्यसेवक एन. डी. तिरसे यांनी तातडीने उपचार सुरू केले. प्रकृतीत सुधारणा झालेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहे.

 

मुलांना दुधातून विषबाधा झाल्याचे निदर्शनाला आलेले आहे. सर्वच्या सर्व 22 मुला-मुलींची प्रकृती सुदैवाने स्थिर आहे.
- एस. डी. सूर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक, नगरसूल

अंडी, दूध अल्पोपाहारातून बंद करावे. दोन्ही पदार्थांच्या गुणवत्तेची खात्री देता येत नाही. त्याऐवजी बिस्किटे देण्यात यावी . 
- विजय पोपट पैठणकर, पालक, नगरसूल