Tue, Nov 19, 2019 15:46होमपेज › Nashik › नरेंद्र मोदी यांची पगडी साकारली पिंपळगावात

नरेंद्र मोदी यांची पगडी साकारली पिंपळगावात

Published On: Sep 20 2019 1:45AM | Last Updated: Sep 20 2019 1:45AM
नाशिक : रावसाहेब उगले

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाप्रसंगी नाशिकमध्ये जाहीर सभेसाठी दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या खास पगडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पंतप्रधानांनीही कौतुक केलेली ही पगडी जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे साकारण्यात आली होती.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाप्रसंगी गुरुवारी (दि.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विजयसंकल्प सभा झाली. मोदी यांच्या प्रत्येक सभेत त्यांना त्या-त्या ठिकाणच्या परंपरेनुसार फेटा किंवा पगडी घातली जाते. त्यानुसार येथील सभेतही माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी मोदी यांचे स्वागत करताना त्यांना खास शिवकालीन पद्धतीची पगडी चढवली. छत्रपती शिवरायांच्या काळातील ही पगडी सर्वांचेच आकर्षण ठरली. ही पगडी पिंपळगाव बसवंत येथील प्रसिद्ध कलावंत योगेश डिंगोरे यांनी बनविली होती. डिंगोरे यांचे नाशिक येथील मेहुणे विजय पवार व उदयनराजे यांचे मेहुणे रत्नशीलराजे हे मित्र आहेत. मोदी यांच्यासाठी पगडी बनविण्याची चर्चा सुरू झाली, तेव्हा रत्नशीलराजे यांनी डिंगोरे यांचे नाव उदयनराजे यांना सुचविले. त्यानुसार डिंगोरे यांना पगडी तयार करण्यास सांगण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीवेळी पिंपळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत डिंगोरे यांनी मोदी यांना प्रत्यक्ष पाहिले होते. त्यामुळे त्यांनी अंदाजेच मोदी यांच्या मापाची पगडी तयार केली. या पगडीचे पंतप्रधानांनीही कौतुक केले व तिच्याविषयी खास भावना व्यक्‍त केल्या. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे यांनी डोक्यावर घातलेली पगडी हा मी माझ्या आयुष्यातील बहुमूल्य क्षण मानतो. आपल्यासाठी हा सन्मान आहे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाला जागण्याची जबाबदारी आहे. या पगडीची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालू, त्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावा, असे त्यांनी सांगितले.