Fri, Jun 05, 2020 05:13होमपेज › Nashik › बसमधील जागेवरुन दोन गटात मारामारी; पोलिस जखमी

बसमधील जागेवरुन मारामारी; पोलिस जखमी

Published On: May 09 2019 4:08PM | Last Updated: May 09 2019 6:03PM
नंदुरबार : प्रतिनिधी

बसमध्ये बसण्याच्या जागेच्या वादाचे रुपांतर दोन गटातील मारामारीत झाले आणि तुफान दगडफेक करीत ऊग्र बनलेल्या जमावाने पाच वाहनांचे नुकसान करीत दुकान फोडून नासधूस केली. अश्रूधुराचा व लाठीमार करून जमावाला नियंत्रित करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, दगडफेकीत करमसिंग गावित हे सहाय्‍यक पोलिसनिरिक्षक जखमी झाले आहेत. अक्कलकुवा येथे बुधवारी (दि.८ ) रात्री ८ नंतर ही घटना घडली. 

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार बसस्थानकातून बुधवारी रात्री ७ वाजता नंदुरबार-सेलंबा ही बस अक्कलकुवाकडे निघाली. तेव्हा अक्कलकुवा येथील व्यापारी गौतम जैन यांच्याशी मौलाना अकील अंहमद शेख (रा.थलई, बिहार) आणि त्यांचे ५ साथीदार यांचा बसण्याच्या जागेवरून वाद झाला. मौलानाने गौतम जैन यांना मारहाण केली. ही घटना अक्कलकुव्यात कळताच दोन्ही बाजूचे जमाव संतप्त होऊन धाऊन आले. चालकाने बस अक्कलकुवा तालुका पोलिस ठाण्यात नेल्यावर दोन्ही जमाव हातापायीवर आले. त्यानंतर एका जमावाने जैन आणि इतरांच्या दुकानांचे कुलूप तोडून प्रचंड नासधूस केली. 

झेंडा चौक, फेमस चौक आणि मशीद भागात तुफान दगडफेक करण्यात आली. यात पाच वाहनांचे मोठे नुकसान झाले. दुसर्‍या जमावानेही तसेच प्रत्युत्तर देणारी दगडफेक केली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी वेळीच बंदोबस्त करीत अश्रूधुराचा वापर केल्यानंतर जमाव नियंत्रीत झाला. रात्री उशीरा दोन्ही कडील १५० हून अधिक जणांविरुध्द दंगल करणे, जमावबंदीचा आदेश मोडल्‍याचा गुन्हे नोंदवण्यात आला आहे.