Wed, Jul 08, 2020 19:27होमपेज › Nashik › नंदुरबारला हिना गावित, के. सी. पाडवी यांची उमेदवारी अर्ज दाखल

नंदुरबारमध्ये हिना गावितांचे शक्तीप्रदर्शन

Published On: Apr 08 2019 2:45PM | Last Updated: Apr 08 2019 3:10PM
नंदुरबार : प्रतिनिधी

भाजपाचे संकटमोचक म्हणून प्रसिद्धी पावलेले मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत भाजपा शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी महायुतीचे उमेदवार डॉ. हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज आज सोमवारी दाखल करण्यात आला. यामुळे जळगावच्या धर्तीवर नंदुरबारलाही उमेदवारीचा (एबी फाँर्मचा) फेरबदल केला जाणार. या चर्चेला अखेरीस पुर्णविराम मिळाला आहे.

यावेळी माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी, उद्योगपती डॉक्टर रवींद्र चौधरी, शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत मोरे, रिपब्लिकन पार्टीचे सुभाष पानपाटील आदी पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जुने निष्ठावान डॉक्टर सुहास नटावदकर यांची कन्या डॉक्टर समिधा नटावदकर यांनीही भाजपाच्या उमेदवारीवर दावा केला होता. पक्षाकडून उमेदवारी आपणासच मिळेल, असा दावा करीत त्यांनी सातत्याने प्रयत्न चालवले होते. यासाठी पक्षातील काही कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा लाभला असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळेच हिना गावित यांची उमेदवारी ऐनवेळी बदलली जाईल, अशी चर्चा पसरली होती. तथापि डॉक्टर समिधा नटावदकर या उद्या मंगळवार रोजी अपक्ष उमेदवारी दाखल करतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

 या दरम्यान, काँग्रेस पक्षातर्फे अँड.के. सी. पाडवी यांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता आज ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारून अन्याय केल्याचे सांगत बंडखोरी करू पाहाणारे काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित, काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, माजी मंत्री पद्माकर वळवी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राम रघुवंशी, मनोज रघुवंशी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मोजक्या पदाधिकाऱ्यांसमवेत जावून अर्ज दाखल करण्यात येणार असल्यामुळे आणि मिरवणूक काढण्यात येणार नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल करताना जमू नये आपापल्या गावात प्रचार करावा असे आवाहन काँग्रेस पक्षाने यापुर्वीच केले होते. त्यामुळे मिरवणुकीद्वारे कोणताही शक्तिप्रदर्शन आज झाले नाही.

डॉक्टर समिधा नटावदकर यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न अद्यापही थांबवलेले नाहीत. आज डॉक्टर समिधा नटावदकर यांनी एक अपक्ष उमेदवारीचा आणि दुसरा भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी करण्याचा असे दोन अर्ज दाखल केले.