Fri, Jun 05, 2020 17:46
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नीती आयोगाच्या मानांकनात नंदुरबारची झेप

नीती आयोगाच्या मानांकनात नंदुरबारची झेप

Published On: Sep 14 2019 7:31PM | Last Updated: Sep 14 2019 7:31PM
नंदुरबार : प्रतिनिधी

निती आयोगाच्या मानांकनात नंदुरबार जिल्ह्याने चांगली प्रगती केली असून 48 व्या स्थानावरून थेट 34 व्या स्थानावर झेप घेतली आहे. येत्या सहा महिन्यात सर्व 49 निर्देशकात चांगली प्रगती करीत जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले. ते नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी दोन बोट ॲब्युलन्स आणि दहा बाईक ॲम्ब्युलन्स देण्यात येतील, अशी ग्वाही ही त्यांनी याप्रसंगी दिली. या बैठकीला खासदार हिना गावीत, निती आयोगाचे सल्लागार सदस्य राकेश रंजन, ‍वित्तसेवा विभागाचे सहसचिव बी.के.सिन्हा, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

निती आयोगातर्फे निश्चित निर्देशकांत होणाऱ्या प्रगतीच्या आधारे मानांकन करण्यात येत असून प्रथम येणाऱ्या जिल्ह्याला 10 कोटी, द्वितीय- 5 कोटी व इतर पाच निर्देशकात पुढे असलेल्या जिल्ह्याला प्रत्येकी 3 कोटी रुपये विकासकामांसाठी देण्यात येतात. बदल घडवून आणण्यासाठी हे प्रोत्साहन आहे.  हे आव्हान स्विकारत जिल्ह्यातून ॲनिमिया आणि सिकलसेल हद्दपार करण्यासाठी लोकचळवळ उभी करावी आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्याला मानाचे स्थान मिळवून द्यावे, असे कांत म्हणाले. जिल्ह्याला अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे चांगले नेतृत्व मिळाले असून एकत्रितपणे बदल घडवून आणण्याचा निश्चय सर्वांनी करावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

यावेळी सिन्हा म्हणाले, बँकांकडून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत समस्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात एक टीम पाठविण्यात आली आहे. त्या टीमच्या अहवालानंतर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. दुर्गम भागात सेवा देताना बँकांना समस्या असल्यास त्यांनी केंद्र सरकारकडे मांडावी, त्याबाबत त्वरीत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. बँकांना कनेक्टीव्हीटीची समस्या असेल तिथे व्हीसॅटद्वारे कामकाज करण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत. बँकांनी जनधन खात्याचा उपयोग चांगली सेवा देऊन व्यवसाय वाढविण्यासाठी करावा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 300 मॉडेल शाळा उभ्या करण्यात येणार असून त्यासाठी आयोगाने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी केले. तोरणमाळमध्ये आदिवासी म्युझिअम आणि तेथील विकास आराखड्याबाबत निती आयोगाने सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.