Fri, Jun 05, 2020 16:02
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › अश्‍लील चित्रफीत प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिलांची निदर्शने  

अश्‍लील चित्रफीत प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिलांची निदर्शने  

Published On: Mar 09 2019 1:24AM | Last Updated: Mar 09 2019 12:25AM
नाशिक : प्रतिनिधी 

महिलादिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक महापालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांना केंद्रीय आरोग्य विभागातर्फे प्रशिक्षणात देण्यात आलेल्या नव्या स्मार्ट फोनमध्ये अश्‍लील चित्रफीत आणि छायाचित्र आढळून आले. या घटनेचा निषेध व्यक्त करून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे डॉ. शेफाली भुजबळ यांच्या उपस्थितीत महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. या घटनेस संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी महिला राष्ट्रवादीने मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली.

यावेळी डॉ. भुजबळ यांच्यासह योगिता हिरे, मनपाच्या माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, नगरसेविका सुषमा पगारे, माजी नगरसेविका चित्रा तांदळे, पूनम वीर, सुरेखा निमसे, दीपा कमोद, शोभा आवारे, सरिता पगारे, मनीषा अहिरराव, रजनी चौरसिया, मीनाक्षी गायकवाड, शाकेरा शेख, माधवी पहेकर,  शकिरा शेख, साहिरा शेख, सलमा शेख आदी महिला उपस्थित होत्या. महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशिक्षणासाठी देण्यात आलेल्या या नवीन स्मार्ट फोनमध्ये अश्‍लील चित्रफीत आणि छायाचित्र असणे हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. प्रशासनाने नव्या मोबाईलमध्ये 2015 पासूनचे चित्रफित व छायाचित्र असल्याने हे मोबाइल नवीन आहे की जुनेच वाटप करण्यात आले, अशी शंका निर्माण होत आहे. यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय आहे. याबाबत तांत्रिक कारण देत मोबाइल पुन्हा जमा करून घेण्यात आले असले तरी या घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

महापौरांनी घेतली आयुक्तांची भेट 

महापौर रंजना भानसी यांनी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन संबंधित पुरवठादार व अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच महापौरांनी मुंबई नाका पोलीस ठाणे येथेही जाऊन पोलीस निरीक्षकांशी चर्चा करून सायबर गुन्हेअंर्तग या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.