Fri, Jul 10, 2020 15:54होमपेज › Nashik › शरद पवारांचा नाशकातून उदयनराजेंना खोचक टोमणा, म्हणाले...

शरद पवारांचा उदयनराजेंना खोचक टोमणा

Published On: Sep 16 2019 3:59PM | Last Updated: Sep 16 2019 7:24PM

उदयनराजे भोसले आणि शरद पवार (संग्रहित छायाचित्र)नाशिक : पुढारी ऑनलाईन

साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक जबर हादरा बसला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: नाशिकमध्ये दाखल झाले असून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे यांनी काल केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. उदयनराजेंना समज येण्यासाठी १५ वर्ष लागली. अन्याय होत होता, तर राजेंना अगोदरच का कळाले नाही? अशी विचारणा पवारांनी केली. ते पुढे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्रित विधानसभेला सामोरे जाणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी १२५ जागांवर, तर मित्र पक्षांना ३८ जागा सोडणार आहे. जागावाटप निश्चित झाल्यानंतर सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, नाशकात कोणत्या मतदारसंघातून नेमके कोण इच्छुक हेही पवार जाणून घेणार आहेत. याआधी ज्या काही निवडणुका झाल्यात, त्यात उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची हे भुजबळ हेच ठरवत असत. यावेळी मात्र दस्तुरखुद्द पवार नाशिकमध्ये दाखल झालेले असताना भुजबळ मात्र मुंबईत काँग्रेससोबत आयोजित बैठकीस हजर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा झाला तेव्हाही भुजबळ यांची गैरहजेरी जाणवली होती. त्यांच्या गैरहजेरी पुतणे समीर हे किल्ला लढवित आहे, हे विशेष!