Wed, Jul 08, 2020 10:21होमपेज › Nashik › भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची ‘फिल्डिंग’

भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची ‘फिल्डिंग’

Published On: Feb 21 2019 1:32AM | Last Updated: Feb 21 2019 1:32AM
संदीप दुनबळे

नव्याने अस्तित्वात आलेल्या दिंडोरी मतदारसंघात दिंडोरी-पेठ, कळवण-सुरगाणा, देवळा-चांदवड, नांदगाव, येवला, निफाड या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील नांदगाव, येवला, निफाड हा भाग सोडल्यास उर्वरित तीन मतदारसंघ आदिवासीबहुल आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात उमेदवार देताना प्रमुख राजकीय पक्षांची कसोटी आहे. दिंडोरी-पेठ, नांदगाव, येवला हे मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. निफाड शिवसेनेकडे, कळवण-पेठ माकपकडे, तर देवळा-चांदवड भाजपकडे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र संमिश्र परिस्थिती आहे. 

सन 2004 पासून आधी मालेगावमधून आणि आता या मतदारसंघातून हरिश्‍चंद्र चव्हाण सातत्याने निवडून येत आहेत. सन 2004 मध्ये त्यांनी जनता दलाचे उमेदवार असलेल्या हरिभाऊ महाले यांना पराभूत केले होते. त्यानंतर 2009 मध्ये 2 लाख 81 हजार मते घेत राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांना पराभवाची धूळ चारली होती. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्याच डॉ. भारती पवार यांच्या विरोधात प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत ‘हॅट्ट्रिक’ केली होती. त्यावेळी मोदी लाटेत चव्हाण यांना 5 लाख 42 हजार 794, तर डॉ. पवार यांना 2 लाख 95 हजार 165 मते मिळाली होती. 

यंदा खा. हरिश्‍चंद्र चव्हाण यांची वाट बिकट मानली जात आहे. मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असले आणि या ‘सुरक्षित’ मतदारसंघातून खुद्द शरद पवार यांनीही कधी काळी चाचपणी केली असली, तरी गेल्या तीन टर्मपासून राष्ट्रवादीला उमेदवार निवडून आणता आलेला नाही. यंदा मात्र राष्ट्रवादीने हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत खेचून आणण्यासाठी व्यूहरचना केली आहे. राष्ट्रवादीकडून डॉ. भारती पवार यांनाच उमेदवारी देण्याचे ठरले होते. पण माजी आमदार धनराज महाले यांना शिवसेनेतून आयात करण्यात आले आहे. डॉ. पवार कुटुंबीयांतील कलहाचा फटका पक्षाला बसू नये, हा त्यामागचा हेतू आहे. धनराज हे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे पुत्र असून, त्यांना चव्हाण यांच्याकडून झालेल्या वडिलांच्या पराभवाचा हिशेब चुकता करायचा आहे. भाजप-शिवसेना युती झाल्याने येथे शिवसेनेला संधी मिळणार नसल्यामुळे महाले यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

दोन्ही काँग्रेस मात्र मागच्या निवडणुकीपासून धडा घेऊन एकत्र आल्या आहेत. माकपही या महाआघाडीत सामील असून मनसेचीही सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वी पेठ, चांदवड, सटाणा या भागांत दौरा करून तसे संकेत दिले होते. माजी पालकमंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांचा येवला तसेच पुत्र पंकज यांचा नांदगाव मतदारसंघ दिंडोरीत समाविष्ट आहेच. भुजबळ यांच्या समता परिषदेचाही या भागात बर्‍यापैकी बोलबाला आहे. सध्या राष्ट्रवादीकडून धनराज महाले यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपकडून हरिश्‍चंद्र चव्हाण हेच उमेदवार असतील, हे उघड आहे.  मतदारसंघात दुरंगीच लढत रंगणार, हे नक्की!

सन 2014 ची स्थिती

हरिश्‍चंद्र चव्हाण, भाजपा        5,42,794 

डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी      2,95,185