Tue, Jul 07, 2020 19:28होमपेज › Nashik › जि.प.अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आग्रही

जि.प.अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आग्रही

Last Updated: Dec 21 2019 1:33AM
नाशिक: प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीही आग्रही असून, शिवसेनेसोबत आघाडी करण्याची तयारी दाखविण्यात आली. राष्ट्रवादी भवन येथे झालेले बैठकीत सर्वाधिकार माजी खासदार समीर भुजबळ यांना देण्यात आले. यावेळी भुजबळ यांनी  अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी सर्वांशी चर्चा करून एकमताने उमेदवार दिले जातील, असे   आश्‍वासन दिले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात आली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, अ‍ॅड.रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, रंजन ठाकरे, पंढरीनाथ थोरे आदी उपस्थित होते.  या महिन्याच्या अखेरीपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होणे अपेक्षित असून, त्याअनुषंगाने पक्षीय पातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सेनेचे सर्वाधिक सदस्य आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. भाजपाची सदस्यसंख्या तिसर्‍या क्रमांकावर आहे.

सत्तेचा जादुई आकडा गाठण्यासाठी 37 सदस्य संख्या आवश्यक असून महाविकास आघाडीचा पॅटर्न येथेही राबविण्याची तयारी केली जात आहे. राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत सेनेसोबत जाण्यास अनुकूलता दर्शविण्यात आली. पण, अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे घेण्यात यावे, अशी मागणीही सदस्यांनी केली. हे करताना राज्यात सेनेला मुख्यमंत्री पद देऊन राष्ट्रवादीने मोठेपणा दाखविला, तसा जिल्हा परिषदेत सेनेने दाखवावा, अशी पुस्तीही जोडण्यात आली. येत्या एक -दोन दिवसात सेना-नेत्यांसोबत चर्चा केली जाणार असून त्यावेळी अध्यक्षपदाची मागणी केली जाणार आहे.

तसेच, या निवडणुकीत जो काही निर्णय घ्यायचा तो भुजबळ यांनीच घ्यावा, असेही ठरले.यावेळी पक्षश्रेष्ठी देतील त्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार सर्व सदस्यांनी बोलतांना व्यक्‍त केला. शिक्षण सभापती यतींद्र पगार, महिला व बालकल्याण  सभापती अपर्णा खोसकर, गट नेते उदय जाधव, डॉ. सयाजी गायकवाड, यशवंत ढिकले, संजय बनकर, सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, महेंद्र काले, अमृता पवार, नूतन आहेर, भास्कर भगरे, यशवंत शिरसाठ यांनी चर्चेत सहभाग घेतला.