होमपेज › Nashik › मुथूट फायनान्स दरोडा प्रकरण : तीन दिवसांनंतरही तपासात प्रगती नाही

मुथूट फायनान्स दरोडा प्रकरण : तीन दिवसांनंतरही तपासात प्रगती नाही

Published On: Jun 18 2019 2:05AM | Last Updated: Jun 18 2019 12:06AM
नाशिक : प्रतिनिधी

उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स येथे दरोडा टाकून ऑडिटरवर गोळीबार करून फरार झालेल्या दरोडेखोरांचा तीन दिवसांनंतरही तपास लागलेला नाही. पोलिसांनी या दरोडेखोरांचा तपास आता परराज्यात घेत असून याआधी कोठे अशा प्रकारे दरोडे पडले त्याचीही माहिती घेत त्यातील गुन्हेगारांची शहानिशा पोलीस करीत आहेत. 

उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्स येथे शुक्रवारी (दि.14) सकाळी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. त्यात फायनान्स कर्मचारी दागिने, पैसे देत नसल्याने तसेच ऑडिटर साजू सॅम्युएलने अलार्म वाजवल्याने संतप्‍त होत दरोडेखोरांनी गोळीबार केला. यात सॅम्युएलचा गोळी लागून मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले. घटनेनंतर आरोपी फरार झाले. पोलिसांनी तातडीने आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजवरून माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली. शनिवारी (दि.15) सकाळी आशेवाडी येथे दरोडेखोरांनी वापरलेल्या तिन्ही दुचाकी सापडल्या. त्यातील एक दुचाकी आडगावच्या हद्दीतून चोरल्याची तर इतर दोन दुचाकीही चोरीच्या असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. या गुन्ह्यातील काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मुथूट कार्यालयाजवळील सीसीटीव्ही फुटेज खराब दर्जाचे असल्याने तेथे फारसे काही हाती लागले नसले तरी आरोपींची ओळख पटविण्यासाठी इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.  दरोडा घालणारे दरोडेखोर परराज्यात पोहचल्याची शक्यता असून,  पोलिसांनी त्या दिशेने काम सुरू केले आहे. या टोळीचा मास्टरमाइंड असून, या गुन्ह्याचे दक्षिणेकडील राज्यात धागेदोरे असावेत, अशी शक्यता व्यक्‍त होत आहे.