नाशिक : प्रतिनिधी
शहर परिसरात अनधिकृत बांधण्यात आलेल्या लॉन्स आणि मंगल कार्यालयांवर महापालिका कारवाई करणार आहे. मागील आठवड्यात काही बड्या लॉन्सवर कारवाई केल्यानंतर आता बुधवार (दि.4)पासून पुन्हा ही मोहीम अतिक्रमण विभागामार्फत हाती घेतली जाणार आहे. नगररचना विभागाने अतिक्रमण विभागाला अनधिकृत गोठे, लॉन्स व मंगल कार्यालयांची यादीच सादर केली आहे.
शहरात एकूण 26 इतके अनधिकृत लॉन्स आहेत. यापैकी महापालिकेने यापूर्वी तीन लॉन्सची बांधकामे हटविली असून, त्यात आडगाव नाका येथील लंडन पॅलेस या बड्या लॉन्सचा समावेश होता. आता उर्वरित 14 लॉन्सवर कार्यवाही करणे बाकी आहे. 14 मधील नऊ लॉन्सधारकांनी नगररचना विभागाकडे बांधकाम नियमित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. यामुळे या बांधकामांविषयी नगररचना काय भूमिका घेणार यावर अतिक्रमण विभागाकडून योग्य ती कार्यवाही होऊ शकते. महापालिकेने यापूर्वी मंगल कार्यालये आणि लॉन्सधारकांना बांधकाम नियमित करण्याचे आवाहन केेले होते. त्यानंतरही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता मनपाने कारवाई हाती घेतली आहे. लॉन्सबरोबरच शहरात 17 अनधिकृत मंगल कार्यालये असून, त्यापैकी 12 कार्यालयांचे बांधकाम हटविले आहेत. तीन मंगल कार्यालये मालकांनी नगररचना विभागाकडे कंपाउंडिंग पॉलिसी अंतर्गत प्रस्ताव सादर केले आहेत. राहिलेल्या दोन मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्त जयश्री सोनवणे यांनी दिली.
नाशिकमध्ये 152 अनधिकृत गोठे
शहरासह परिसरात 152 अनधिकृत गोठे आहेत. गोठ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचू नये, यामुळे महापालिकेने शासन आदेशानुसार गोठे शहराबाहेर स्थलांतरित करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. तसेच, रितसर परवानगी घेण्याबाबतही आदेश दिले होते. त्यानंतरही अनेकांनी मनपा आदेशाकडे दुर्लक्ष केले. यामुळे महापालिकेने कारवाई हाती घेतली आहे. नाशिकरोड विभागातील 20 अनधिकृत गोठे यापूर्वीच हटविले आहेत. नाशिक पूर्व विभागातील 38 पैकी 12 गोठेधारकांनी स्वत:हून गोठे काढून घेतले आहे. पंचवटीतील 43, सिडकोतील 17, सातपूर विभागातील 26 गोठे हटविण्यात येणार आहे. तर नाशिक पश्चिम विभागातील आठ पैकी चार गोठे काढले असून, चार बाकी आहेत.