Tue, Jun 02, 2020 22:34होमपेज › Nashik › केंद्राच्या धर्तीवर मनपाची सुकन्या योजना

केंद्राच्या धर्तीवर मनपाची सुकन्या योजना

Published On: Aug 30 2019 1:41AM | Last Updated: Aug 30 2019 1:41AM
नाशिक : प्रतिनिधी

मुलींचा जन्मदर वाढावा तसेच एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणार्‍या दाम्पत्यांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने केंद्र शासनाच्या धर्तीवर नाशिक महापालिकेमार्फत ‘सुकन्या’ योजना राबविण्यात येत असून, मुलींच्या नावे पाच हजार रुपयांची मुदतठेव ठेवण्यात येणार आहे.  योजनेची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. 

देशातील मुलींची घटती लोकसंख्या विचारात घेता मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने सुकन्या योजना सुरू केली आहे. त्या धर्तीवर नाशिक महापालिका क्षेत्रात मुलींच्या जन्माचा दर वाढविण्याच्या अनुषंगाने व भ्रूणहत्या रोखण्याच्या दृष्टीने मनपा क्षेत्रात ज्या दाम्पत्यांना दोन मुली आहेत व त्या मुलींवर संबंधितांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे किंवा एका मुलीवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली आहे. अशा दाम्पत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपा महिला व बालकल्याण विभागामार्फत सुकन्या योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मुलींच्या नावे पाच हजार रुपये बक्षीस देण्यास व बक्षिसाची रक्‍कम देताना दोन मुलींकरिता त्यांच्या नावाने 18 वर्षे वयापर्यंत मुदतठेव स्वरूपात देण्यात येणार आहे. या योजनेला 20 जून 2019 रोजी झालेल्या महासभेने मंजुरी दिलेली आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव व कुटुंब नियोजन’ हा विषय वैद्यकीय विभागाच्या अखत्यारित येतो. यामुळे ही योजना महिला व बालकल्याण विभागाऐवजी वैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याचे स्थायी समितीसाठी सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.