Tue, Jul 07, 2020 08:04होमपेज › Nashik › मुंबई-नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाला ब्रेक?

मुंबई-नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाला ब्रेक?

Last Updated: Dec 03 2019 10:45PM
नाशिक : प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने बहुचर्चित मुंबई-नागपूर समृद्धी  एक्स्प्रेस-वेच्या कामाला स्थगिती दिली आहे. प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतरच पुढील कामाबाबतचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रकल्पाचे काम रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, प्रकल्पासाठी 95 टक्क्यांहून अधिक जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, प्रकल्पाअंतर्गत काही ठिकाणी अंडरपास व पुलाचे कामही प्रगतिपथावर आहे.

मुंबई-नागपूर दरम्यानच्या 712 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी 10 जिल्ह्यांतील 25 तालुक्यांमधील जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातून हा प्रकल्प जात असून, त्यासाठी 1,251 पैकी केवळ 40 गुंठे जमिनीचे अधिग्रहण बाकी आहे. त्याचवेळी इगतपुरी तालुक्यात समृद्धीवरील एकमेव सर्वांत मोठ्या बोगद्याचे काम प्रगतिपथावर आहे. तर दोन्ही तालुक्यांमध्ये अंडरपास व पुलाचे कामही सुरू झाले आहे. दरम्यान, इतर जिल्ह्यांमध्येही कमी-अधिक प्रमाणात कामाची सारखीच प्रगती आहे. प्रकल्पाअंतर्गत बहुतांश जिल्ह्यांमधील जमिनीचे सपाटीकरण पूर्ण झाले असून, अनेक ठिकाणी कामाने वेग घेतला आहे. सद्यस्थितीत 30 ते 40 टक्के काम पूर्णत्वास आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळते आहे. समृद्धीच्या कामाचा वेग बघता पुढील वर्षाच्या अखेरीस या मार्गावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होण्याचे अंदाज बांधले जात होेते. प्रत्यक्षात मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर नवीन सरकारने प्रकल्पांच्या मूल्यमापनाचे काम हाती घेतले आहे. या मूल्यमापनानंतरच प्रकल्प पुढे सुरू ठेवायचा की बासनात गुंडाळायचा, याचा निर्णय होणार आहे. ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ असल्याने तोपर्यंत मात्र समृद्धीला ’ब—ेक’ लागणार आहे.

प्रकल्पाच्या किंमतीत वाढ?

समृद्धी प्रकल्पाची सर्वप्रथम कल्पना मांडल्यानंतर त्यासाठी 45 हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. प्रत्यक्ष संकल्पना कागदावर उतरता-उतरता प्रकल्पाचा खर्च 56 हजार कोटींवर पोहोचला. दरम्यानच्या काळात प्रकल्पासाठी आवश्यक तो निधी उभारताना मागील सरकारची पुरती दमछाक झाली. त्याचवेळी प्रकल्पाच्या किमतीत अधिक भर पडली. तूर्तास नव्या सरकारने प्रकल्पालाच सध्या ’ब—ेक’ लावल्याचे समजते आहे. त्यामुळे समृद्धी प्रकल्पाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होण्याची तसेच तो पूर्ण होण्याचा कालावधी लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जमीन हस्तांतरण सुरू

जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर तालुक्यातून समृद्धी प्रकल्प जात आहे. त्यासाठी सुमारे 1,250 हेक्टरहून अधिक जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 40 गुंठ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने ते रखडले आहे. दरम्यान, सरकारने त्यांच्या स्तरावर प्रकल्पासाठी एक कंपनी स्थापन केली आहे. नाशिकसह दहाही जिल्ह्यांमधील अधिग्रहीत केलेली जमीन सध्या या कंपनीकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.