Fri, Jun 05, 2020 17:37
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › पेस्ट कंट्रोल ठेक्याला मुदतवाढ?

पेस्ट कंट्रोल ठेक्याला मुदतवाढ?

Published On: Aug 02 2019 1:18AM | Last Updated: Aug 02 2019 1:18AM
नाशिक : प्रतिनिधी

पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दीड महिन्यापूर्वी प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव महासभेत मंजूर झाला; परंतु त्याचा ठरावच महापौरांकडून प्रशासनाला सादर न झाल्याने निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत प्रशासनाची अडचण निर्माण झाली आहे. यामुळे ठरावाला विलंब करण्यामागील नेमका अर्थ काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

येत्या 9 ऑगस्टला पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याची मुदत संपुष्टात येत आहे. यामुळे खरे तर त्यापूर्वीच निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. परंतु, ठेका संपण्यास आठ दिवस शिल्लक असूनही निविदेविषयी कोणत्याही हालचाली नाही. यामुळे निविदा प्रक्रिया राबविली जाऊ नये आणि मुदतवाढही दिली जावी, यासाठी सगळा खटाटोप सुरू आहे. याच कारणामुळे सत्ताधारी पदाधिकार्‍यांनी महासभेत मंजूर झालेला 37 कोटींच्या प्रस्तावाचा ठराव प्रशासनाला सादर केला नाही की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 9 तारखेला मुदत संपणारा ठेका तीन वर्षांसाठी देण्यात आला होता. आता नवीन ठेकादेखील तीन वर्षांसाठी असून, त्याचे प्राकलन 37 कोटींपर्यंत आहे.  दोन वर्षांपूर्वी शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूसह विविध साथ रोगांनी नाशिककरांना हैराण केले होते. त्यावेळी स्थायी समितीचे सदस्य जगदीश पाटील यांच्यासह काही सदस्यांनी पेस्ट कंट्रोल ठेक्याच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी केली होती. परंतु, त्यावेळीदेखील आरोग्य विभागाने संबंधित ठेकेदाराला पाठीशी घातले होते.

आताही तोच प्रकार मुदतवाढीसाठी सत्ताधारी पदाधिकारी आणि प्रशासनातील काही अधिकार्‍यांकडून सुरू आहे. खरे तर ठेक्याची मुदत संपण्यापूर्वी दोन ते अडीच महिने अगोदरच निविदा प्रक्रिया राबवायला पाहिजे. तशा प्रकारचे आदेश प्रशासनाने खातेप्रमुखांना दिलेेले आहेत. मात्र, खातेप्रमुखदेखील जाणीवपूर्वक ऐनवेळी प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करतात आणि त्यामुळे निविदा प्रक्रियेला उशीर होतो. यामुळे नाईलाजाने आरोग्याशी संंबंधित विषय असल्याने त्यात मुदतवाढ द्यावी लागते. 

अनेकांसाठी संकट हीच संधी

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूने हातपाय पसरले आहेत. इतर साथरोगाच्या रुग्णांमध्येही वाढ झालेली आहे. हेच संकट संधी म्हणून अनेकांनी आपला डाव साधण्यास सुरुवात केली आहे. पाऊस आणि साथरोगाचे कारण पुढे करून आरोग्याशी संबंधित विषय असल्याने मुदतवाढ देण्याचे इप्सित साध्य करून घ्यायचे. असा सर्व प्रकार महापालिकेत नेहमीच पाहावयास मिळतो. आताही हीच कारणे पुढे करून मुदतवाढीसाठी हालचाली सुरू आहेत.