Fri, Jun 05, 2020 04:31होमपेज › Nashik › आत्महत्येस प्रवृत्त केल्याची साजन सानपच्या पत्नीची तक्रार

आत्महत्येस प्रवृत्त केल्याची साजन सानपच्या पत्नीची तक्रार

Published On: Nov 29 2018 12:58AM | Last Updated: Nov 28 2018 7:02PMनाशिक : प्रतिनिधी 

पोलिस उपनिरीक्षक साजन सानप यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी त्यांच्या पत्नी शैला सानप यांनी संशयितांविरुद्ध उपनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षिका आणि तिचा पोलिस खात्यातील पती यांच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साजन सानप हे पोलिस उपनिरीक्षक पदावर मुंबई येथे कार्यरत होते. दोन महिन्यापूर्वी त्यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण केले होते. होमगार्ड पोलिस कर्मचारी ते पोलिस उपनिरीक्षक या पदावर त्यांनी यशस्वी झेप घेतली होती. नाशिकच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात दोन महिन्यापूर्वी आपले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथील आंबोली पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी ते रूजू झाले होते. 

पीडित शिक्षिका व तिचा पती यांनी संगनमत करून एक जानेवारी 2015 ते 27 नोव्हेंबर 2018 पर्यंत साजन सानप यांच्या घरी जाऊन या शिक्षिकेने अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. सानप यांनी ही मागणी पूर्ण न केल्याने संशयित महिला व तिच्या पतीने सानप यांची पत्नी शैला यांना ब्लॅकमेल केले. त्यानंतर त्यांना तुझ्या नवऱ्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची तसेच जातीवाचक शिवीगाळ करतो म्हणून केसेस दाखल करणार असल्याची धमकी दिली आणि या संबंधी सानप यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यामुळेच मनोधैर्य खचलेले साजन सानप यांनी आपली सामाजिक प्रतिमा खराब होण्याच्या तणावातून आपले जीवन संपवल्याचे तक्रारात म्हंटले आहे. या घटनेचा अधिक तपास उपनगरचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते करीत असून या प्रकरणात आणखी काही गौडबंगाल उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.