Sat, Nov 16, 2019 03:59होमपेज › Nashik › जळगावात मंकी कॅप गँगचा धुमाकूळ, ११ लाखांचा ऐवज लंपास

जळगावात मंकी कॅप गँगचा धुमाकूळ

Published On: Jul 22 2019 8:39AM | Last Updated: Jul 22 2019 8:41AM
जळगाव : पुढारी ऑनलाईन 

चाळीसगाव शहरातील पवन कॉम्प्लेक्समधील सिगारेट दुकानाचे शटरचे कुलूप तोडून मंकी कॅप घातलेल्या चौघांनी दुकानातील रोख, चांदी व सिगारेटचे बॉक्स असा एकूण ११ लाख ३५ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल लंपास  केला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंकी कॅप घातलेले चौघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

चाळीसगाव शहरातील जेडीसीसी बॅंकेजवळ पवन कॉंपलेक्समध्ये ८ नंबर गाळ्यात सुरेश सावलदास रावलानी (वय, ३५ रा. शांतीनगर, चाळीसगाव) यांचे नॅशनल टोबॅको सिगारेटचे दुकान आहे. २० जुलै रोजी रात्री ९.३० वाजता दुकान बंद करुन ते नेहमीप्रमाणे घरी गेले. रात्रीच्या सुमारास अज्ञात चार चोरटयांनी तोंडाला मंकी कॅप लावून दुकानाचे शटर तोडून दुकानात ठेवलेले सिगारेटचे ८ खोके व ड्रावरमधील ८७ हजार ५०० रुपये रोख, ८० हजारांची २ किलो चांदी असा एकूण ११ लाख ३५ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल चारचाकी गाडीत टाकून पोबारा केला.

रविवारी सकाळी ११.३० वाजता सुरेश रावलानी हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना हा प्रकार समजला. दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटे चोरी करताना दिसत आहेत. या घटनेचा चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक महावीर जाधव करीत आहेत.