Tue, Jun 02, 2020 14:06होमपेज › Nashik › मोबाइल हिसकावणार्‍या टोळीचा पर्दाफाश

मोबाइल हिसकावणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Published On: Aug 22 2019 1:49AM | Last Updated: Aug 21 2019 11:50PM
नाशिक : प्रतिनिधी

दुचाकीवरून येत पादचार्‍यांकडील मोबाइल हिसकावणार्‍या टोळीचा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छडा लावला आहे. संशयितांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या तिघांच्या टोळीकडून पोलिसांनी दोन लाख 47 हजार रुपयांचे 13 मोबाइल जप्‍त करण्यात आले आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांनी एकास अटक केली असून, अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे.

अतिष विजय शाह (19, रा. रामवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तर त्याचे दोन अल्पवयीन साथीदार ताब्यात घेतले आहेत. अतिष याच्यासह अल्पवयीन संशयितांनी दुचाकीवर ट्रिपल सीट बसून वेगवेगळ्या परिसरातून पादचार्‍यांकडील मोबाइल हिसकावून नेले होते. या तिघांनीही एप्रिल महिन्यात गंगापूर, पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन मोबाइल हिसकावून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. 5 एप्रिलला पारिजातनगर परिसरातून परमेश्‍वर लहु किडे (17, रा. कॉलेजरोड) या युवकाकडील 14 हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला होता. तसेच 15 एप्रिलला सकाळी नऊच्या सुमारास पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियमजवळून अतिष व अल्पवयीन संशयिताने नयन विलास निकम (20, रा. धात्रक फाटा) याच्याकडील 15 हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला होता. त्याचप्रमाणे 28 एप्रिलला रात्री 9.30 च्या सुमारास तिघा संशयितांनी डीजीपीनगर ते सम्राट सिग्नलदरम्यान सलीम कय्यूम शेख (49, रा. डीजीपीनगर) यांच्याकडील मोबाइल हिसकावून नेला होता.

या चोरीच्या घटनांबाबत मंगळवारी (दि.20) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयितांनी 25 जूनला रात्री आठच्या सुमारास एक्स्लो पॉइंटजवळ तुषार सुधाकर खिल्लारी (28, रा. अंबड) यांच्याकडील 15 हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून संशयितांना ताब्यात घेतले. त्यावेळी संशयितांकडून मोबाइल हिसकावल्याचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, हिसकावून नेलेले 13 मोबाइल जप्‍त केले आहेत. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, पोपट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, रवींद्र बागूल, संजय मुळक, वसंत पांडव, प्रवीण कोकाटे, विशाल काठे, नीलेश भोईर, गणेश वडजे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.