Sun, Jun 07, 2020 12:30



होमपेज › Nashik › जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून डझनभर इच्छुक तयारीत

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून डझनभर इच्छुक तयारीत

Published On: Jul 11 2019 1:37AM | Last Updated: Jul 10 2019 11:02PM




नाशिक : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यासाठी अनेक इच्छुकांनी दंड थोपटले असून, विरोधी पक्षातील काही इच्छुकही संपर्कात असल्याचा दावा स्थानिक नेत्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, माजी खासदार देवीदास पिंगळे हेही आमदार होण्यास इच्छुक आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांची चाचपणी केली असून, चक्क अर्ज भरून घेतले आहे. त्यात बागलाण तालुक्यातून विद्यमान आमदार दीपिका चव्हाण पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. कळवण तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोये यांनीही अर्ज भरला आहे. चांदवड तालुक्यातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर, माजी आरोग्य सभापती ज्योती माळी यांचे पती बाळासाहेब माळी, सुनील आहेर यांनीही अर्ज भरून देताना लढण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. नांदगाव तालुक्यातून विद्यमान आमदार पंकज भुजबळ, तर निफाड तालुक्यातून माजी आमदार दिलीप बनकर यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही अर्ज भरला नाही. येवला तालुक्यातून माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्यासह माणिकराव शिंदे यांनीही अर्ज भरला आहे.

दिंडोरी तालुक्यातून मात्र विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासोबत धनराज महाले यांनी लढण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. महाले हे लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले आणि त्यांना उमेदवारीही मिळाली होती. आता पुन्हा महाले यांनी विधानसभा लढण्याची तयारी केल्याने पक्षांतर्गत डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सिन्‍नर तालुक्यातून एकमेव बाळासाहेब वाघ यांचा अर्ज प्राप्त झाला आहे.  शहरात असलेल्या तीन मतदारसंघांत मात्र एकापेक्षा अनेक इच्छुक आहेत. पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे गौरव गोवर्धने, सरचिटणीस विजय आव्हाड, शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी पक्षाकडे अर्ज भरून दिला आहे. मध्य मतदारसंघातून प्रदेश सहकोषाध्यक्ष विश्‍वास ठाकूर, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता भामरे, विद्यमान नगरसेवक गजानन शेलार, सुफीयान जीन, प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी पक्षाकडे अर्ज भरून दिला आहे.

पश्‍चिम मतदारसंघातून भाजपातून आलेले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, प्रदेश उपाध्यक्ष नाना महाले, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव या इच्छुकांनी अर्ज भरले आहेत.नाशिकरोड देवळाली मतदारसंघातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ, प्रदेश प्रांतिक प्रतिनिधी लक्ष्मण मंडाले, तालुका उपाध्यक्ष सुनील कोथमिरे, नितीन मोहितेे, गौतम दोंदे, उपजिल्हाध्यक्ष दीपक वाघ, माजी आमदार बबन घोलप यांचे पुतणे रविकिरण घोलप, असे डझनभर इच्छुक आहेत. भास्कर बदादे यांनी इगतपुरीतून लढण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.