Tue, Jun 02, 2020 12:57होमपेज › Nashik › कुपोषण गंभीर होतेय...

कुपोषण गंभीर होतेय...

Published On: Mar 18 2018 1:31AM | Last Updated: Mar 18 2018 1:12AMजिल्ह्यात कुपोषित बालकांचा अडीच हजारांवर पोहोचलेला आकडा कुपोषणाचे गांभीर्य अधोरेखित करणारा ठरला आहे. कुपोषण निर्मूलनासाठी ज्या काही उपाययोजना करणे आवश्यक आहेत, त्यापैकीच एक असलेल्या ग्राम बालविकास केंद्रांचा मुद्दाही यानिमित्ताने प्रकाशझोतात आला आहे. सरकार निधी उपलब्ध करून देत नाही म्हणून लोकवर्गणी जमा करण्याची वेळ अधिकार्‍यांना यावी, हीच  मुळी लाजिरवाणी गोष्ट म्हणायला पाहिजे. सरकारची उदासीनता नेमकी संपणार कधी, हा कळीचा मुद्दा ठरू पाहात आहे. 

जिल्ह्यात पंधरापैकी निम्मे तालुके आदिवासी आहेत. कुपोषणाचे प्रमाण याच तालुक्यांमध्ये जास्त असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने उपलब्ध करून दिलेली आकडेवारी सांगते. खरे तर, कुपोषणाचे मूळ नेमके कशात आहे, हेच आधी शोधून काढायला पाहिजे. आई आणि वडील दोघेही उदरनिर्वाहासाठी बाहेर पडत असल्याने बालकांचे पालनपोषण योग्यरीतीने होत नाही. म्हणजे, ज्या वयात या बालकांना शरीराच्या पोषणासाठी जे-जे घटक आवश्यक आहेत, नेमक्या त्याच वयात ते मिळत नसल्याने बालकांच्या वजनात घट होते. शिवाय पालक दिवसभर घराबाहेर राहत असल्याने बालकांच्या आरोग्याकडेही त्यांचे दुर्लक्ष होते. खरे तर, अठरा विसे दारिद्य्र पाचवीलाच पूजलेले असल्याने आदिवासी भागातील या पालकांना पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर पडणे हे अपरिहार्यच आहे. (कोणत्याही आई-वडिलांना आपले मूल कुपोषित व्हावे, असे थोडेच वाटत असते). 

आता मायबाप सरकारच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते कधी काळी कुपोषणाच्या मुद्यावर गंभीर होते. कधी काळी म्हणण्याची वेळ का आली तर सध्याचे सरकार कुपोषण निर्मूलनासाठी नेमक्या काय योजना राबवित आहेत, हेच मुळी कोणाला माहिती नाही. किंबहुना ज्या काही योजना आहेत, त्या राबविण्याकामी पुरेसा निधीही उपलब्ध करून देण्यास हात आखडता घेतला जात आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास  ग्राम बालविकास केंद्रांचे देता येईल. कुपोषित बालकांना या केंद्रांमध्ये दाखल करून घेऊन त्यांचे पंचवीस दिवस योग्य आहार देऊन उदरभरण केले जाते. दरम्यानच्या काळात आरोग्याकडेही वेळोवेळी लक्ष पुरविले जाते. आता ज्यांच्यावर ही केंद्रं चालविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यांना त्यासाठी पैसा तर हवा ना! पण, मायबाप सरकारने ही केंद्रं सुरू करण्याचे आदेश काढले खरे पण, निधीच दिला नाही. निधीच  नसेल तर कशी सुरू राहणार ही केंद्रं? स्थानिक पातळीवर म्हणजे जिल्हा परिषदेचे म्हणाल तर एकट्या डॉ. भारती पवार यांनीच कुपोषणाच्या मुद्यावर चर्चा घडवून आणली आणि ममत्व दाखविले. (अन्य सदस्यांना तर कुपोषणावर चर्चा करण्यात फारसा रसच नव्हता).  तेव्हा कुठे महिला व बालकल्याण विभागही कामाला लागला.

नाही तर संबंधित अधिकारीही सभांमधून उपस्थित होणार्‍या प्रश्‍नांना निधी नसल्याचे कारण देत अनास्थेचेच दर्शन वेळोवेळी घडवित होते. उद्योजकांनी आपल्या सीएसआर फंडातून कुपोषणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून जिल्हाधिकारी पत्राद्वारे आवाहन करणार होते. त्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने प्रस्ताव पाठवायचा होता. पुढे या निधीचे काय झाले, तो मिळाला की नाही, प्रस्ताव पाठविला की नाही, हे या विभागाचे अधिकारीच जाणोत. पण, सध्या लोकवर्गणीतून तीन लाख 35 हजार रुपये जमा झाले आणि त्यातून 410 ग्राम बालविकास केंद्रं सुरू झाली, असा संबंधित अधिकार्‍याचाच दावा आहे. लोकवर्गणी जमा करण्याची वेळ आली याचा अर्थ सीएसआर फंडातून निधी उपलब्ध झालाच नाही. कारण फंड उपलब्ध झाला असता तर लोकवर्गणीचा प्रश्‍नच नव्हता. असो. केंद्रं सुरू होणे महत्त्वाचे होते.

मग, ती कोणत्याही मार्गाने का होईना सुरू झाली हे महत्त्वाचे! एक मात्र खरे की, कुपोषणाप्रति ममत्व सामान्यजनांनी दाखविले. दातृत्वाची भावना दाखवित जमेल तशी मदतही केली, ही बाब  अधोरेखित झाली.  ममत्व डॉ. पवार यांच्या जोडीला अन्य सदस्यांनीही दाखविले असते तर बरे झाले असते. जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी सरकारी दरबारी पायधूळ झाडणे असो की, त्याचाच एक भाग म्हणून कुक्कुपालन केंद्रांचे स्थलांतर करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेणे असो, या कामी पदाधिकार्‍यांनी जी काही धडपड चालविली ती मात्र ग्राम बालविकास केंद्रं सुरू करण्यासाठी निधी द्या म्हणून दाखविली गेली नाही. नाही तरी कुपोषण निर्मूलनातून प्रसिद्धी थोडीच मिळणार आहे! प्रशासकीय इमारत उभी राहिली तर कोनशिलेत नाव  तर कोरले जाईल. इमारत आमच्याच काळात उभी राहिली म्हणून डांगोरा तर पिटता येईल आणि सहा मजली इमारत कोणाच्या नजरेला पडणार नाही, असे थोडेच होणार आहे. म्हणजे, कुपोषित बालकांचा आकडा सद्यस्थितीत अडीच हजारांवर पोहोचला, त्यास नुसते सरकारच नाही, तर सदस्यांची अनास्थाही कारणीभूत म्हटली पाहिजे. 

- संदीप दुनबळे

 

Tags : nashik, nashik news, Malnutrition increased,