Tue, May 26, 2020 12:46होमपेज › Nashik › शरद पवार नाशकात, मात्र छगन भुजबळांची दांडी!

शरद पवार नाशकात, मात्र छगन भुजबळांची दांडी!

Published On: Sep 16 2019 1:12PM | Last Updated: Sep 16 2019 3:08PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व छगन भुजबळनाशिक : प्रतिनिधी

राज्यभरात पक्ष सोडून जाणार्‍यांची यादी दररोज लांबत असून ही पडझड रोखण्यासाठी दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरसावले आहेत. शरद पवार यांच्‍या उपस्थितीत आज (ता.१६) नाशिक जिल्ह्याची आढावा बैठक होत आहे. विशेष म्हणजे, पवार यांच्या या दौर्‍यात माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे.

पक्षांतराची झळ नाशिकलाही बसली असून काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. भुजबळ हेही सेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा दरम्यानच्या काळात रंगली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. भेटून जाणारे दुसर्‍याच दिवशी सेना-भाजपात दाखल होत असल्याने विश्वास ठेवणार तरी कोणावर, अशा प्रश्न पवार यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळेच की काय, ते स्वत: नाशिकमध्ये दाखल झाले असून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा ते घेत आहेत. 

विशेष म्हणजे, याचवेळी कोणत्या मतदारसंघातून नेमके कोण इच्छुक हेही पवार जाणून घेणार आहेत. याआधी ज्या काही निवडणुका झाल्यात, त्यात उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची हे भुजबळ हेच ठरवत असत. यावेळी मात्र दस्तुरखुद्द पवार नाशिकमध्ये दाखल झालेले असताना भुजबळ मात्र मुंबईत काँग्रेससोबत आयोजित बैठकीस हजर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा झाला तेव्हाही भुजबळ यांची गैरहजेरी जाणवली होती. त्यांच्या गैरहजेरी पुतणे समीर हे किल्ला लढवित आहे, हे विशेष!