होमपेज › Nashik › महाराष्ट्राचे तुकडे पडू नयेत : राऊत

महाराष्ट्राचे तुकडे पडू नयेत : राऊत

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:39PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

राज्यात जातीचे राजकारण शिगेला पोहोचले असून, आगीत तेल टाकणार्‍या घटना घडत आहेत. अशा घटनांचा वापर करून काही जण पुढे जात आहेत, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व पुढे येत असल्याच्या मुद्यावर महाराष्ट्राचे तुकडे पडायला नकोत, अशी भूमिका मांडली. 

उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आलेल्या राऊत यांनी नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी शिवसैनिक, तसेच पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. भीमा-कोेरेगाव येथील घटनेनंतर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची दिलेली हाक आणि त्यास मिळालेल्या प्रतिसादानंतर राजकीय वर्तुळात बहुजन समाजातून प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली. त्यावर राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, आंबेडकर हे नेते आहेत. ते बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. महाराष्ट्रातील समाजव्यवस्था, एकता टिकली पाहिजे.

महाराष्ट्राचे तुकडे पडणार नाहीत, याची काळजी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली पाहिजे. सध्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना न पटणारे राजकारण सुुरू आहे. समाजासमाजांत तेढ निर्माण झाली असून, कटुता वाढत आहे. ही कटुता कमी झाल्यास महाराष्ट्राला गतवैभव प्राप्‍त होईल, असा विश्‍वासही  राऊत यांनी व्यक्‍त केला. भीमा- कोरेगाव घटनेप्रकरणी केवळ हिंदुत्ववादी संघटनांना दोषी धरून चालणार नाही, तर घटनेच्या आधी शनिवारवाड्यावर काय घडले होते, त्या ठिकाणी कोणाची सभा झाली, हेही तपासून पाहायला हवे, असेही  त्यांनी सांगितले.

बापट प्रगल्भ राजकारणी

गिरीश बापट हे ज्येष्ठ मंत्री आणि प्रगल्भ राजकारणी आहेत. तसेही आता सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून, पुढील वर्षी निवडणुका आहेत. त्यामुळे बापट यांनी पुण्यात केलेले वक्‍तव्य म्हणजे निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली, असे म्हणावे लागेल. बापट हे अस्सल पुणेरी असून, जे त्यांच्या पोटात होते, तेच ओठावर आले, असे राऊत यांनी सांगितले. 

शेतकरीप्रश्‍नी वेगळे सत्र बोलवा

तीन तलाकसंदर्भात संसदेत सत्र बोलाविण्यात आले, त्याप्रमाणे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर स्वतंत्र सत्र बोलवायला हवे, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्‍त केली. कारण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असून, ही चिंताजनक बाब आहे. मुंबईत आगीचे सत्र सुरू असल्याच्या प्रश्‍नावर, लोकसंख्या वाढत असून, परप्रांतीयांचे लोंढे वाढत आहेत. हे लोंढे वेळीच थांबवले गेले नसल्याचे ते म्हणाले.