Wed, Jun 03, 2020 00:26होमपेज › Nashik › महाजनादेश यात्रा आज नाशिकमध्ये 

महाजनादेश यात्रा आज नाशिकमध्ये 

Published On: Sep 18 2019 1:49AM | Last Updated: Sep 18 2019 1:49AM
नाशिक : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.18) दुपारी 3 वाजता नाशिकमध्ये दाखल होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी भाजपातर्फे जय्यत तयारी करण्यात आली. महाजनादेशच्या निमित्ताने भाजपातर्फे शहरात वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्री दत्तक नाशिकसाठी कोणती घोषणा करतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसर्‍या टप्प्याचा समारोप गुरुवारी (दि. 19) नाशिकमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पंचवटीमधील साधुग्रामच्या मैदानावर होणार आहे. या सभेच्या माध्यमातून भाजपा राज्यातील विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार असल्याने या सभेला अधिक महत्त्व प्राप्‍त झाले आहे. तत्पूर्वी बुधवारी (दि.18) महाजनादेश यात्रा नाशिकमध्ये दाखल होणार आहे. भाजपातर्फे या यात्रेच्यानिमित्ताने बाइक रॅली व रोड-शो चे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे दुपारी 3 वाजता पाथर्डी फाटा येथे आगमन होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या यात्रेचा प्रारंभ होईल. पाथर्डी फाटा ते पंचवटीमधील तपोवन येथील सभास्थळ असा यात्रेचा मार्ग असेल.

पाथर्डी फाटा येथून प्रथम बाइक रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर अंबड लिंकरोडने उत्तमनगर, पवननगर, सावतानगर, दिव्य अ‍ॅडलॅब, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉल, संभाजी चौक, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, मायको सर्कल, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे रॅलीचा समारोप होईल. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी भाजपाने जय्यत तयारी केली आहे. गेल्या 15 दिवसांपासून त्यासाठी पक्षाचे राज्यस्तरावरील नेते व पदाधिकारी नाशिकमध्ये ठाण मांडून बसले आहेत. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या स्वागतात कोणतीही कमी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या सभेद्वारे दत्तक नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेचा समारोप करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने विधानसभेच्या प्रचाराचा नारळदेखील भाजपातर्फे वाढविण्यात येणार आहे. या यात्रेचा समारोप नाशिकमध्ये होत असल्याने दत्तक नाशिकसाठी मुख्यमंत्री फडणवीस कोणती मोठी घोषणा करतात याकडे लक्ष लागले आहे. 

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून यात्रा
पाथर्डी फाटा ते हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान अशी बाइक रॅली काढण्यात येईल. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून महाजनादेश यात्रेचा प्रारंभ होईल. भाजपातर्फे तयार करण्यात आलेल्या खास रथावर मुख्यमंत्री स्वार होतील. ही यात्रा त्र्यंबक नाका, जीपीओ रोड, अण्णा भाऊ साठे पुतळा, गंजमाळ, शिवसेना भवन, शालिमार, नेहरू उद्यान, शिवाजी रोड, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा येथून पंचवटी कारंजा अशी जाईल. समारोप तपोवनातील सभास्थळावर होणार आहे.  

मोदींच्या सभेसाठी वॉटरप्रूफ मंडप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवनातील 20 एकर जागेवर जाहीर सभा होणार आहे. सभेला अडीच ते तीन लाख जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सभास्थळी 50 एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार आहे. तसेच 12 वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले असून, सभेच्या पार्श्‍वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली  आहे.