Tue, May 26, 2020 12:51होमपेज › Nashik › महाड : शिवतर फाटा ते पारमाची रस्त्याला भेगा 

महाड : शिवतर फाटा ते पारमाची रस्त्याला भेगा 

Published On: Aug 04 2019 2:17PM | Last Updated: Aug 04 2019 2:26PM

महाड : शिवतर फाटा ते पारमाची रस्त्याला पडलेल्‍या भेगा महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील वरंध भागात पारमाची रस्त्याला भेगा पडण्‍याच्‍या घटनेची काल पुनरावृत्ती झाली आहे. रस्‍त्‍याला भेगा गेल्‍याने नागरिकांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील वर्षी झालेल्या घटनेनंतर शासनाने भूगर्भीय वैज्ञानिकांना येथील जमिनीची पाहणी करण्यासाठी बोलविले होते. मात्र वैज्ञानिकांचा अहवाल गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायत, पंचायत समितीकडे उपलब्ध करून दिला नसल्याची माहिती अनिल मालुसरे यांनी दिली आहे. या रस्‍त्‍यावर रामदास पठार ते पारमाची सुनेभाऊकडे जाणारी एसटी  सेवा बंद पडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून महाड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्य वृष्टीने ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी जमिनीला भेगा तसेच दरड कोसळण्याच्या घटनांची सुरुवात झाली आहे. मागील वर्षीप्रमाणेच शिवथर फाटा ते पारमाची या मार्गावर सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतराच्या जमिनिला मोठ्या भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे.

यासंदर्भात अनिल मालुसरे म्‍हणाले की, मागीलवर्षी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शासनामार्फत भूगर्भीय वैज्ञानिकांना जमिनीची पाहणीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, एक वर्षानंतरही या संबंधित वैज्ञानिकांचा अहवाल ग्रामपंचायत अथवा पंचायत समिती महाडकडे उपलब्ध झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळले जात असल्याचा आरोप मालुसरे यांनी केला.  

काल घडलेल्या घटनेनंतर परिसरातील पारमाची गाव व पारमाची बौद्धवाडी येथील नागरिकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली. सुमारे तीन दशकांपूर्वी पारमाची येथे दरड कोसळून १० जणांचा मृत्यू झाला होता.  याची आठवण करुन देत शासनाने येथील घटनांसंदर्भात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती पाहणी करण्याकरता पाठवून ग्रामस्थांची  असलेली शंका दूर करावी अशी मागणी केली आहे.