Wed, Jan 27, 2021 08:15होमपेज › Nashik › दिव्यांगांच्या आधारासाठी बनवली आगळी कुबडी-खुर्ची!

दिव्यांगांच्या आधारासाठी बनवली आगळी कुबडी-खुर्ची!

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 29 2018 11:35PMनाशिक : सुदीप गुजराथी

दिव्यांग महिलेला कुबडीसह पडताना पाहिल्यावर ‘त्यांच्या’ डोक्यात विचारचक्रे फिरू लागली, दिव्यांगांना भररस्त्यात आधार मिळावा, यासाठी नेमके काय करता येईल, याच्या मंथनातून तयार झाली ‘चेअरक्रच’.. म्हणजे कुबडीला दिलेली खुर्चीची जोड... ‘त्या’ दोघा मित्रांनी तयार केलेली आगळी ‘कुबडी-खुर्ची’ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

पंचवटीतील स्वप्नील राजगुरू व आशिष उगले अशी या दोघा या सर्जनशील तरुणांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्याने जात असताना स्वप्निलला सुमारे 55 वर्षे वयाची दिव्यांग महिला कुबडीसह खाली पडल्याचे दिसले. त्याने आधार देऊन तिला उभे केले. मात्र, तिला कोठे बसवावे, असा प्रश्‍न त्याला पडला. अखेर त्याने एका हॉटेलच्या खुर्चीवर त्या महिलेला बसवले. आशिष उगले याचाही मित्र दिव्यांग असल्याने त्याला या अडचणीची जाणीव होती. या दोघांनी दिव्यांगांची ही समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल, याचा विचार सुरू केला. दिव्यांगांकडे जशी कुबडी असते, तशीच खुर्ची का असू नये, असे त्यांच्या मनात आले व त्यातून ‘चेअरक्रच’ या संकल्पनेचा जन्म झाला. 

‘चेअरक्रच’ची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी या दोघांनी दिव्यांग बांधवांना भेटून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. रस्त्याने चालताना त्यांना कोठे थांबावयाचे असल्यास बसण्यासाठी काहीच उपलब्ध नसते, हे त्यांच्या लक्षात आले. इंटरनेटवर शोध घेतला असता, दिव्यांगांसाठी सध्या अत्याधुनिक कुबडी उपलब्ध आहे. मात्र, तिला खुर्चीची सोय नाही, हेदेखील समोर आले. त्यानंतर त्यांनी कागदावर चेअरक्रचची काही रेखाटने केली. सर्व संभाव्य  अडचणींचा विचार करून अनेक महिन्यांनंतर त्यांनी एक डिझाइन निश्‍चित केले. आता प्रश्‍न होता या कुबडी-खुर्चीच्या वजनाचा. या खुर्चीचे वजन दिव्यांगांना पेलवेल एवढेच असणे गरजेचे होते. त्यामुळे कुबडीतच काही सुधारणा करता येईल का, याचा विचार सुरू झाला.

त्यानुसार वजनाला हलकी असलेली फोल्डिंग कुबडी-खुर्ची तयार करण्यात आली. कुबडीच्या मध्यभागी कुशनची खुर्ची तयार करण्यात आली असून, ही चेअरक्रच अ‍ॅडजस्टेबल आहे. व्यक्‍तीप्रमाणे तिची उंची कमी-अधिक करता येते. 90 ते 95 किलो वजनाची व्यक्‍तीही त्यावर सहजरीत्या बसू शकतो. या आगळ्या खुर्चीचे दिव्यांगांनी कौतुक केल्यानंतर या दोघा मित्रांना समाधान लाभले. ही खुर्ची सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.