Fri, Jun 05, 2020 15:33
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मतमोजणी दुसर्‍याच दिवशी का नाही?

मतमोजणी दुसर्‍याच दिवशी का नाही?

Published On: Sep 22 2019 1:33AM | Last Updated: Sep 22 2019 1:33AM
नाशिक : प्रतिनिधी

निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मतदान आणि मतमोजणी यामधील तीन दिवसांचे अंतर  ठेवण्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार छगन भुजबळ यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. एकाच टप्प्यात निवडणुका होणार असेल आणि ईव्हीएमवरच निवडणुका होणार असेल तर दुसर्‍याच दिवशी मतमोजणी घेण्यास काय हरकत होती, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. 

येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. आणि त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. दोन्ही प्रक्रियेत तीन दिवसांचे अंतर ठेवल्याने या कालावधीत सत्ताधार्‍यांकडून काहीही गैरप्रकार होऊ शकतात, अशी शंका भुजबळ यांनी उपस्थित केली आहे. 

एका क्‍लिकसरशी ईव्हीएम मशीनवर मतदान मोजले जाते आणि मतदान होत असेल तर इतके तीन दिवसांचे अंतर ठेवण्यामागील उद्देश काय, अशी विचारणा त्यांनी करत प्रशासनाच्या एकूणच कारभारावर शंका उपस्थित केली आहे. 

लोकसभा निवडणुका आणि त्या आधीही ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान घेण्यास सत्ताधारी पक्ष वगळता इतर सर्वच विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध केला जात आहे. त्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोटही बांधली होती. मात्र, हा विरोध मावळला असला तरी भुजबळ यांनी आचारसंहिता जाहीर होताच तारखांवर आक्षेप घेतला आहे. मतदान आणि मतमोजणीमधील अंतराविषयी केवळ नेतेच नव्हे, तर नागरिकांमधूनही शंका उपस्थित केली जात असून, त्याची चर्चा सुरू झाल्याचे त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.