Fri, Jun 05, 2020 05:11होमपेज › Nashik › भुजबळांसाठी ‘कदम-कदम’ बढाए जा!

कालचं पालकत्व बरं होतं

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:34PMनाशिक : कुंदन राजपूत

भाजपापासून ते काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना भुजबळ प्रेमाचे सध्या भरते आले आहे. त्याला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून जिल्ह्याची होणारी उपेक्षा हेच प्रमुख कारण असल्याची खंत आज अडगळीत टाकण्यात आलेल्या जुन्या भाजपा नेत्यांकडून व्यक्त होत आहे. 

छगन भुजबळ यांचे बगलबच्चे ज्या मस्तीत वागत होते त्यामुळे भुजबळांनीही जिल्ह्याची सहानुभूती गमावली. स्वत: भुजबळ यांचे स्वत:चे वागणे नेमस्त होते. त्यांनी कधीही कमरेला पिस्तूल खोचून स्टंटबाजी केली नाही. उलट जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची कामे करण्यात ते व्यस्त असत. त्या उलट सध्याच्या पालकमंत्र्यांना वेळ मिळाला तर ते नाशिकला हजेरी लावतात. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांचा ओढा पुन्हा भुजबळांकडे वाढला असल्याचे म्हटले जाते. 

भुजबळप्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत सध्या सर्वपक्षीय स्पर्धा असली तरी शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांचा त्यात कोणी हात धरु शकत नाही. पंचवटीत झालेल्या बैठकीत आ.कदम यांनी उपस्थिती लावत भुजबळांवर अन्याय होत असल्याची खंत व्यक्त केली होती. मराठवाड्याला पाणी सोडण्यात आले त्यावेळी महाजन यांच्यावर टीका करताना ‘कालचं पालकत्व बरं होतं’ असे सांगत भुजबळांचे गुण गायले होते. 

राज्यात सलग दुसर्‍यांदा आघाडीची सत्ता आल्यावर भुजबळांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले. मात्र, काही कारणामुळे दुसर्‍या टर्ममध्ये भुजबळांना उपमुख्यमंत्री पद हे अजित पवार यांच्या हट्टासाठी सोडावे लागले होते. त्यावेळी निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांनी भुजबळांचे नेतृत्व नाकारुन ‘दादां’ची तळी उचलली होती. भविष्यातील हा धोका ओळखून भुजबळांनी पुढील निवडणुकीत पत्ते पिसले. निफाडमध्ये राष्ट्रवादीसाठी पोषक वातावरण असताना तेथे शिवसेनेचे अनिल कदम निवडून आले. ‘भुजातील बळा’ मुळे आ.कदम निवडून आले अशी चर्चा होती. निफाड आणि येवला हे मतदार संघ एकमेकांना लागून आहेत. सन 2014 विधानसभा निवडणुकीत आ. कदम यांच्या विरोधात असंतोष असल्याने दिलीप बनकर निफाडचा गड सर करतील अशी चिन्हे होती. मात्र भुजबळांनी शेजारधर्माचे पालन करत आ. कदम यांना छुपी रसद पोहचवली आणि अवघ्या दोन ते तीन हजार मतांनी ते विजयी झाले. भुजबळांच्या मदतीशिवाय आ. कदम विधानसेभची पायरी चढू शकले नसते,अशी चर्चा होती.

सध्या भुजबळ तुरुंगात आहेत. आ. कदम यांना पुढील निवडणुकीत निफाडमधून हॅटट्रिक करायची असेल तर भुजबळांचा आशीर्वाद पाठीशी असणे गरजेचे आहे. त्यामुळे भुजबळांवर अन्याय होत असल्याची सर्वात जास्त जाणीव ही आ. कदम यांना झाली आहे. अर्थात हे ओळखूनच दिलीप बनकर यांनाही पक्षांतर्गत विरोध सोडून भुजबळांसाठी ‘अन्याय पे चर्चा’ आयोजित करण्याची वेळ आली यातच सारे आले, अशी चर्चा निफाड तालुक्यात व जिल्ह्यातही रंगली आहे. भुजबळ यांना जामीन मिळाला तर हे सर्वपक्षीय नेते असेच त्यांच्या पाठीशी राहतील काय हे पाहणेही रंजक ठरणार आहे हे तितकेच खरे!