Fri, May 29, 2020 10:02



होमपेज › Nashik › आमदार गोटे यांचे गिरीश महाजनांना खुल्या चर्चेचे आव्हान

आमदार गोटेेंचे महाजनांना खुल्या चर्चेचे आव्हान

Published On: Jan 07 2019 6:05PM | Last Updated: Jan 07 2019 6:07PM




धुळे : प्रतिनिधी  

राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांच्या पसंतीच्या वाहिनीवर समोरासमोर महानगरपालिका निवडणुकी संदर्भात चर्चा करावी. या चर्चेत माझा पराभव झाल्यास मी राजकारण सोडून देईल, असे आव्हान आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले आहे.

यावेळी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर देखील टीका केली आहे. धुळ्यात झालेल्या या पत्रकार परिषदेत लोकसंग्रामचे अध्यक्ष तेजस गोटे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे, भाजपचे योगेश मुकुंदे उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आमदार अनिल गोटे यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे मंत्री जयकुमार रावल व गिरीष महाजन यांनी सहा लाख धुळेकरांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. मतदान यंत्रात फेरफार करुन गंभीर स्वरुपाचा अपराध केला असून याची चौकशी आयपीएस दर्जाच्या अधिका-याच्या माध्यमातून करण्याची मागणी गृहसचिव सुनिल पोरवाल, पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हा पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे यांच्याकडे केली आहे. 

मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे प्रभारी म्हणुन ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी सोपवली. तेथील यशाचा बुरखा फाटला आहे. मला पराभव पचविण्याचा सल्ला महाजन यांनी देण्याची आवश्यकता नाही. कारण विजयाचा उन्माद आपल्या वागण्यातून दिसतो आहे. आपण मतपत्रिकेव्दारे मतदान घेण्याची तयारी असल्याचे वाक्य वापरले आहे. त्यानुसार वागून दाखवा. तसेच कोणत्याही वाहिनीवर तुमच्याबरोबर समोरासमोर चर्चा करण्याची तयारी असल्याचे आमदार गोटे यांनी सांगितले आहे.

तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी माझ्यावर कारवाई करणार नसल्याचे पत्रकारांना सांगितले. पण कार्यकत्यांसमोर धुळ्याच्या आमदारकीचे ग्रहण सुटल्याचे वाक्य वापरले. यातून भाजपा नेत्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असे दिसत असून दानवे अदखलपात्र असल्याचा टोला देखील आमदार अनिल गोटे यांनी लगावला आहे.

 ईव्हीएम संदर्भात आता विरोधी पक्षाने केवळ आरोप करुन चालणार नाही. त्यांना हा आरोप सिद्ध करावा लागेल. यासाठी माझ्याकडे मशीनचे हॅकर, दलाल यांनी माहिती असल्याचे गोटे यांनी सांगितले आहे. धुळे महानगर पालिका निवडणुकीच्या काळात जीओचा मोबाईल टॉवर मतमोजणी केंद्राच्या परिसरात उभारला गेला. याचे रेकॉर्ड मनपाकडे नाही. यावरुन सरकारी यंत्रणा देखील वेठबिगार म्हणून वागत असल्याची टिका गोटे यांनी केली आहे.