Fri, Jun 05, 2020 05:24होमपेज › Nashik › फेसबुकवरील ओळखीतून महिलेचा ४२ लाखांना गंडा

फेसबुकवरील ओळखीतून महिलेचा ४२ लाखांना गंडा

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:44AMनाशिक : प्रतिनिधी

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर संशयित महिलेने इंदिरानगर परिसरात राहणार्‍या व्यावसायिकाला बियाणे विक्रीचे आमिष दाखवत 42 लाखांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इंदिरानगर परिसरातील प्रमोद पांडुरंग मोरे (47) विद्युत व्यावसायिक असून, त्यांनी इंडिया मार्ट साइटवर नोंदणी केलेली आहे. जून 2017 पासून यूकेमधील डॉ. ख्रिस्ती जून्स नावाच्या संशयित महिलेने मोरे यांच्याशी संपर्क साधला. संशयित डॉ. ज्युन्स हिने केंट फार्मास्युटिकल्स, यू. के. या कंपनीतून मी बोलत असल्याचे सांगत मोरे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर तिने नॅस्ट्रोजेन सीड्स या बियाण्यांची मागणी मोरे यांच्याकडे केली. मात्र मोरे यांना या बियांबाबत काहीही माहिती नसल्याने त्यांनी महिलेकडेच चौकशी करीत या बिया कुठे मिळतील, याची चौकशी केली. त्यावेळी डॉ. ज्युन्स हिने मोरे यांना दिल्लीतील प्रियंका शर्मा नावाच्या महिलेचा मोबाइल नंबर दिला.

मोरे यांनी प्रियंकाशी संपर्क साधून बियांची मागणी केली. त्यावेळी बियांची पाकिटे तुम्हाला विकत घ्यावे लागतील. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीस एक लाख 27 हजार रुपये बँकेत जमा करावे लागतील असे प्रियंकाने मोरे यांना सांगितले. त्यामुळे मोरे यांनी आरटीजीएसमार्फत पैसे भरले. त्यानंतर संशयित डॉ. ज्यून्स हिने मॉरिस मूर नावाच्या आमच्या कंपनीतून तुम्हाला पर्चेस ऑर्डर देऊ, असे मोरे यांना सांगितले. मुंबईतील गोरेगाव स्टेशन परिसरातील कंपनीच्या कार्यालयात गेले. तेथून त्यांनी पर्चेस ऑर्डर मिळवली. त्यानंतर मोरे यांना पुन्हा बियांची 20 पाकिटे घेण्यास सांगितले. त्यानुसार मोरे यांनी पाकिटे विकत घेण्यासाठी संशयितांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात 41 लाख 64 हजार 595 रुपये भरले. संशयित महिलांनी त्यांचा विश्‍वास संपादन करून बियांचा व्यापार करण्याचे सांगत त्यांची फसवणूक केली. दरम्यान, मोरे यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये अज्ञात महिलांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक देवराज बोरसे हे तपास करीत आहेत.