Fri, Jun 05, 2020 18:29होमपेज › Nashik › मनपाच्या तीन इंग्रजी शाळांना कुलूप

मनपाच्या तीन इंग्रजी शाळांना कुलूप

Published On: Jul 12 2019 1:56AM | Last Updated: Jul 11 2019 11:05PM
नाशिक : प्रतिनिधी

इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी बरोबरी करण्यासाठी महापालिकेने मोठ्या हौशीने सुरू केलेल्या पाचपैकी तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना टाळे लावण्यात आले आहे. यंदा कशाबशा दोन शाळा सुरू असून, त्यातील विद्यार्थी संख्या बोटावर मोजण्याइतकी असल्याने या शाळादेखील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 

शहरातील गोरगरीब तसेच सर्वसामान्य कुटुंबातील पात्र मुलांनाही इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, या दृष्टिकोनातून महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या होत्या. आर्थिक परिस्थितीमुळे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण शक्य नसलेल्या कुटुंबाला मनपाच्या या निर्णयामुळे आधार मिळाला होता. मात्र, हा आधार कायमस्वरूपी राहू शकला नाही. 

कारण पाचपैकी तीन शाळांना कुलूप लावण्यात आले असून, सध्या सिडको विभागातील रायगड चौक आणि पंचवटी विभागातील मखमलाबाद नाका येथील दोन शाळाच सध्या सुरू आहेत. त्यातही या शाळांमध्ये 15 ते 20 पटसंख्या आहे. यामुळे या शाळासुद्धा किती दिवस सुरू राहतील असा प्रश्‍नच आहे. इंग्रजी शाळांसाठी हवा असलेला प्रशिक्षित स्टाफ व शिक्षक महापालिकेने उपलब्ध करून दिलेला नाही. बहुसंख्य शिक्षक आणि स्टाफ वशिलेबाजीतून नियुक्त करण्यात आल्याने अनेकांना ना धड इंग्रजी, ना धड मराठीतून शिकविता आले. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकले नाही.तसेच काही शाळांमध्ये कर्मचारीवर्ग नेमणूक करण्यावरून अंतर्गत राजकारण सुरू झाल्याने या शाळाच बंद झाल्या. इंग्रजी माध्यमासाठी आवश्यक असलेले वातावरण व सुविधा महापालिकेकडून मिळाल्या नाहीत. अशा एक ना अनेक कारणांमुळे शाळांना कुलूप लावण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे.