Mon, Sep 21, 2020 17:36होमपेज › Nashik › जिल्हा परिषद सीईओपदी लीना बनसोड यांची नियुक्ती

जिल्हा परिषद सीईओपदी लीना बनसोड यांची नियुक्ती

Last Updated: Feb 14 2020 11:53PM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भुवनेश्वरी एस. यांची अवघ्या सहा महिन्यांच्या आत बदली झाल्यानंतर जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची असलेली प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून, लीना बनसोड यांची पदोन्नतीने या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आर. यू. शिंदे यांच्याही बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी भुवनेश्वरी एस. यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पद्भार स्वीकारल्यानंतर त्यांनी कामकाजाला सुरुवात करून बैठकांचा धडाका लावला होता. कामकाज समजून घेत असतानाच त्यांची काही महिन्यांतच बदली झाली. सद्यस्थितीत उज्ज्वला बावके यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विभागीय महसूल आयुक्त कार्यालयातील दिलीप स्वामी यांच्या नावाची जोरदार चर्चा दरम्यानच्या काळात रंगली होती. पण,  सरकारी पातळीवरून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले तेव्हा त्यात नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे नाव समाविष्ट नव्हते. त्यामुळे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असेल, याबाबत कर्मचार्‍यांमध्येही उत्सुकता होती. तसेच बावके यांच्याकडे प्रभारी कार्यभार असल्याने महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्याचे धाडस दाखविले जात नव्हते. परिणामी कामकाजाची गती थंडावली होती. 

कर्मचार्‍यांची उत्सुकता आता संपुष्टात आली आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची पदोन्नतीने नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. याचबरोबरच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांनी राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानाचे अतिरिक्त संचालक म्हणून काम केले आहे. दोन्हीही अधिकार्‍यांची एकाच वेळी नियुक्ती झाल्याने रखडलेल्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 "