Tue, May 26, 2020 12:56होमपेज › Nashik › वीजतारांचा शॉक; सासू-सुनेचा मृृत्यू 

वीजतारांचा शॉक; सासू-सुनेचा मृृत्यू 

Published On: Sep 30 2019 1:51AM | Last Updated: Sep 29 2019 11:58PM

सिडको : प्रतिनिधी

घराच्या गच्चीवर कपडे वाळत टाकत असताना उघड्या वीजतारांचा शॉक लागून सासू-सुनेचा मृत्यू होण्याची घटना रविवारी (दि. 29) घडली. या घटनेत भाऊ-बहीणही गंभीर जखमी झाले असून, नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. 

शिवपुरी चौकात शांताराम केदारे यांच्या घराच्या गच्चीवर सकाळी त्यांच्या आई सोजाबाई मोतीराम केदार (82) व पत्नी सिंधूबाई शांताराम केदार (40) कपडे वाळत टाकत होत्या. त्यांना घराशेजारून गेलेल्या  वीजतारांचा झटका बसला. त्यात या दोघींचा जागीच मृत्यू झाला, तर नंदिनी शांताराम केदार (23) व शुभम शांताराम केदार (19) हे बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथून मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली व वीजतारा भूमिगत केलेल्या नसल्याने महावितरण कंपनीविरोधात संताप व्यक्‍त केला. घटना समजताच आमदार सीमा हिरे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, मुकेश शहाणे, डी.जी. सूर्यवंशी, नीलेश ठाकरे, छाया देवांग यांच्यासह संतोष सोनपसारे, संजय भामरे, दिलीप देवांग, भूषण राणे, शीतल भामरे, अंकुश वराडे, बाळा दराडे, मंदाकिनी जाधव, दिलीपकुमार भामरे, मामा ठाकरे, कैलास मोरे, गोविंद घुगे, लक्ष्मण जायभावे आदी नेते घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी महावितरण कंपनीने वीजतारा भूमिगत कराव्यात व केदारे कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करावी या मागणीसाठी घरासमोर आंदोलन केले. महावितरण कंपनीचे अधिकारी आल्यानंतर नागरिकांनी त्यांना घेराव घातला. लोकप्रतिनिधी व महावितरण कंपनीचे अधिकारी अंबड पोलीस ठाण्यात गेले. तेथे पोलीस उपआयुक्‍त विजय खरात, सहायक आयुक्‍त समीर शेख, वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महावितरणचे अधिकारी प्रवीण दरोली, मोरे, अनिल थोरात यांनी केदारे कुटुंबीयांना उपचारांचा खर्च व भरपाई महावितरण कंपनीकडून मिळवून देण्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सिडको भागातील बहुतांश वीजतारा अद्यापही भूमिगत झालेल्या नाहीत. त्या उघड्या असल्याने शॉक लागून कित्येक मृत्यू झाले आहेत, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

केदारे कुटुंबीयांना आर्थिक मदत : केदारे कुटुंबातील शुभम व नंदिनी या गंभीर जखमी झालेल्या बहीण व भावाच्या उपचारासाठी नुकसान भरपाई मिळवून देण्याचे पत्र महावितरण कंपनीने दिले. तसेच माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी 50 हजार रोख दिले, तर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी 51 हजार रुपयांची मदत जाहीर केली. श्रेयवादावरून रखडले काम : केदारे यांच्या घरापासून वीजतारा भूमिगत करण्याचे काम राहिले होते. लोकप्रतिनिधींच्या श्रेयवादावरून या वीजतारा भूमिगत करण्याचे काम थांबले आहे. वीजतारा भूमिगत झाल्या असत्या तर ही घटना घडली नसती, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

राखीव पोलिसांना पाचारण : या घटनेनंतर शिवपुरी चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले व आंदोलन करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात आले.

शासकीय रुग्णालयासमोर रास्ता रोको : केदारे कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्‍त विेशास नांगरेपाटील यांनी जखमी शुभम व नंदिनीची या बहीण-भावाची घेतली व उपस्थितांची समजूत घातली.