Fri, Oct 30, 2020 18:34होमपेज › Nashik › कांदाचाळीत शिरलेला बिबट्या जेरबंद

कांदाचाळीत शिरलेला बिबट्या जेरबंद

Last Updated: Jun 28 2020 10:47PM
सिन्नर : पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यातील आडवाडी खालची येथील अण्णा विठ्ठल बिन्नर यांच्या कांदाचाळीत शिरलेल्या मादी बिबट्याला शुक्रवारी (दि.26) मध्यरात्री जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका श्‍वानाचा पाठलाग करीत ही मादी कांदाचाळीत शिरली. श्‍वानाच्या भुंकण्याच्या आवाजाने बिन्नर कुटुंबीयांनी चाळीकडे धाव घेतली. बॅटरीच्या उजेडात बिबट्या दिसल्याने त्यांनी चाळीचा दरवाजा बंद केला. वनविभागाला माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. के. आगळे, सरोदे, आकाश रुपवते, रोहित शिंदे, सदगीर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला.  शुक्रवारी मध्यरात्री बिबट्या पिंजर्‍यात अडकला. विशेष म्हणजे श्‍वानही चाळीतच अडकून पडलेला होता. ज्याची शिकार करण्यासाठी बिबट्या चाळीत शिरला, त्या श्‍वानाला बिबट्याने साधे जखमी केले नाही. श्‍वानाने जवळपास 15 ते 17 तास बिबट्याच्या दहशतीत घालवले. वनविभागाने बिबट्याला माळेगाव-मोहदरी वनोद्यानात ठेवले असून, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी मादी बिबट्याची तपासणी केली. परवानगीनंतर या मादीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

 "