Mon, Aug 03, 2020 14:53होमपेज › Nashik › नाशिक : जानोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

नाशिक : जानोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Last Updated: Jan 15 2020 3:02PM

संग्रहित छायाचित्रदिंडोरी : प्रतिनिधी 

तालुक्यातील जानोरी येथील शिवनईरोड परिसरात गेल्या दोन दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून परवा रात्री त्यांनी शेतकऱ्यांच्या दोन कुत्र्यांचा फडशा पाडला. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे सावट पसरले आहे. जानोरी येथील शिवनई वाट परिसरात असलेल्या नामदेव तिडके, अण्णासाहेब वाघ, दिनेश थारोळकर, चुनीलाल तिडके, भारत ठाकरे यांच्या शेतालगत गेल्या दोन दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता.

सोमवारी रात्री बिबट्याने दोन कुत्रे खाल्ल्याने शेतकरी वर्गात भीतीचे सावट पसरले असून रात्रीच्या वेळेत शेतात काम करणारा मजूर वर्ग तसेच शाळेत जाणारे विद्यार्थी बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वनपाल वैभव गायकवाड चंद्रभान जाधव घटनास्थळी भेट देत बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. या परिसराच्या लगत असलेल्या केंद्रीय संरक्षण प्रकल्पाच्या भिंतीवरून सदर बिबटे या परिसरात येत असल्याने समोर आले आहे. या परिसरात याअगोदरही बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडलेल्या असल्याने वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.                                    

जानोरी परिसरात असलेल्या भागात केंद्रीय संरक्षण प्रकल्पाच्या भिंतीलगत असलेल्या झाडावरून हे बिबटे नागरी वस्तीत येऊन भक्ष्याच्या शोधात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले चढवतात. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गास पाळीव जनावरांना बंदिस्त जागेत बांधावे तसेच लहान मुले यांना रात्रीच्या वेळी घराबाहेर एकटे सोडू नये अशा सूचना या परिसरातील नागरिकांना देण्यात आल्या आहे.
- वनपाल वैभव गायकवाड