Tue, May 26, 2020 13:18होमपेज › Nashik › लासलगावमध्ये कांद्याची आवक मंदावली

लासलगावमध्ये कांद्याची आवक मंदावली

Published On: Oct 04 2019 1:24PM | Last Updated: Oct 04 2019 12:56PM

संग्रहित छायाचित्रलासलगाव : वार्ताहर  

येथील मुख्य बाजार समितीच्या आवारामध्ये उन्हाळ कांद्याची आवक मंदावल्याचे दिसून येत आहे. आज येथील बाजार समितीच्या आवारामध्ये १५५ वाहनांमधून कांद्याची फक्त १६००  क्विंटल आवक होऊन कांद्याला कमीत- कमी १००० सरासरी २६५० जास्तीत- जास्त ३०७० भाव मिळाला. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारणत: बारा ते पंधरा हजार क्विंटलची आवक या दिवसांमध्ये होत असते. मात्र कांद्याचे माहेरघर असलेल्या लासलगावमध्ये आज फक्त १६०० क्विंटल कांद्याची आवक विक्रीसाठी आली. जूना कांदा संपत आला असून नवीन कांदा येण्यास अजून १ महिन्याचा कालावधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाने लावलेल्या निर्बंधामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तर दूसरीकडे ७ ऑक्टोबरपासून बाजार समित्यांमध्ये शेतकरी संघटनेमार्फत बंद पुकारण्यात  येणार आल्याचे वृत्त होते. मात्र याबाबत लासलगाव बाजार समिती यांना अद्यापपर्यंत बंदबाबत कुठलाही पत्रव्यवहार झाला नसल्याचे सचिव नरेंद्र वाढवने यांनी सांगितले.

दुसरीकडे केंद्र सरकारने कांद्याबाबत संवेदनशील झाल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमार्फत व्यापाऱ्यांकडून रोज होणाऱ्या खरेदी-विक्रीचा अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. केंद्र शासनामार्फत साठवणुकीवर मर्यादा आणल्यानंतर आता शासनाने व्यापाऱ्यामार्फत होणाऱ्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर लक्ष केंद्रित केले आहे. शासनाच्या विविध निर्णयामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागणार आहे.