होमपेज › Nashik › कुसुमाग्रज प्रतिष्ठान;४ विश्‍वस्तांची नियुक्‍ती

कुसुमाग्रज प्रतिष्ठान;४ विश्‍वस्तांची नियुक्‍ती

Published On: Jul 15 2019 2:01AM | Last Updated: Jul 14 2019 10:51PM




नाशिक : प्रतिनिधी

येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्‍वस्तपदी ज्येष्ठ विचारवंत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांच्यासह ज्येष्ठ नाट्य समीक्षक जयंत पवार, मविप्रचे माजी संचालक प्रकाश वाजे, अ‍ॅड. अजय निकम यांची निवड करण्यात आली आहे. 

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या नियुक्त्या करण्यात आल्या. प्रतिष्ठानसाठी एकूण 15 विश्‍वस्तांची तरतूद आहे. विश्‍वस्त अशोक हांडे यांची मुदत संपल्याने ते निवृत्त होत असून, अन्य तीन जागा रिक्‍त होत्या. या चार जागा न्या. चपळगावकर, जयंत पवार, प्रकाश वाजे, अ‍ॅड. अजय (दत्तप्रसाद) निकम यांच्या नियुक्‍तीद्वारे भरण्यात आल्या. न्या. चपळगावकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून, ते वैचारिक लेखन करणारे संवेदनशील लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी यापूर्वीही प्रतिष्ठानच्या विश्‍वस्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रसिद्ध मराठी नाटककार, नाट्य समीक्षक व पत्रकार  जयंत पवार यांची अनेक नाटके प्रसिद्ध  असून, त्यांनी कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती समितीतही काम केले आहे. पंधराव्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले असून, त्यांना सन 2012 चा  साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. अ‍ॅड. अजय (दत्तप्रसाद) निकम हे सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांनी श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे. सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाजे यांनी मविप्र संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.