Wed, Aug 12, 2020 21:47होमपेज › Nashik › नाशिक शिक्षक मतदारसंघ : शिवसेनेने इतिहास घडवला, दराडे विजयी

नाशिक शिक्षक मतदारसंघ : शिवसेनेने इतिहास घडवला, दराडे विजयी

Published On: Jun 29 2018 12:05AM | Last Updated: Jun 29 2018 12:05AMनाशिक : प्रतिनिधी 

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेने इतिहास घडवला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे हे विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत किशोर दराडे यांनी 16 हजार 886 मते घेत आघाडी घेतली होती. तर, राष्ट्रवादी पुरस्कृत संदीप बेडसे यांना 10 हजार 970 व भाजपा उमेदवार अनिकेत पाटील यांना सहा हजार 329 मते मिळाली होती. दरम्यान, पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली 23 हजार 990 मते कोणत्याही उमेदवाराला मिळाली नाहीत. दुसर्‍या क्रमाकांच्या पसंतीच्या मतांवरच विजयाचे गणित ठरणार असल्याने मतमोजणीत प्रचंड चुरस पाहायला मिळाली होती. रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी सुरू होती.

उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील वेअर हाउस येथे गुरुवारी (दि.28) सकाळी सुरू झाली होती. मतदानाच्या दिवशी झालेला गोंधळ लक्षात घेता मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूण 16 उमेदवार रिंगणात होते. प्रारंभी पाचही जिल्ह्यांतून आलेल्या मतपेट्या उघडण्यात आल्या.

पहिल्या फेरीत तीन टप्प्यांमध्ये 20 टेबलांवर 49 हजार 742 मतांची मोजणी करण्यात आली. त्यापैकी शिवसेनेचे किशोर दराडे यांना निर्णायक 16 हजार 886 मते मिळाली. राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार संदीप बेडसे यांना 10 हजार 970 मते पडली. भाजपाचे अनिकेत पाटील थेट तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना सहा हजार 329 मतांवर समाधान मानावे लागले. तर इतर उमेदवार साडेपाच हजारांचा आकडादेखील गाठू शकले नाहीत. सेनेचे दराडे आणि राष्ट्रवादीचे बेडसे यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मात्र, दराडे यांनी पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे उमेदवार बेडसे यांच्यावर जवळपास सहा हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली.

दरम्यान, मतमोजणीत 47 हजार 978 मते वैध ठरली. विजयासाठी आवश्यक 23 हजार 990 मते कोणत्याही उमेदवाराला मिळाली नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दुसर्‍या क्रमाकांच्या पसंतीची मते मोजण्याचा निर्णय घेतला. दुसर्‍या फेरीतील मतमोजणीला रात्री आठ वाजता सुरुवात झाली. 

पहिल्या फेरीतील मते

किशोर दराडे (शिवसेना) - 16,886, संदीप बेडसे (राष्ट्रवादी) - 10,970, अनिकेत पाटील (भाजपा) - 6,329,  भाऊसाहेब कचरे (अपक्ष) - 5,167, अमृतराव शिंदे (अपक्ष) - 3,209, अजित दिवटे (अपक्ष) - 34, अशोक पाटील (अपक्ष) - 16, महादेव चव्हाण (अपक्ष) - 24,  विठ्ठल पानसरे (अपक्ष) - 38, प्रतापदादा सोनवणे - 560, बाबासाहेब गांगुर्डे (अपक्ष) - 51,  शालिग्राम भिरुड (अपक्ष) - 3876, मुक्तार कासीम (अपक्ष) - 59, रवींद्र पटेकर (अपक्ष) -179, विलास पाटील (अपक्ष) - 266,  सुनील पंडित (अपक्ष) -313,