Fri, Jun 05, 2020 17:12
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मंत्री महोदयांच्या ‘खेकडा’ विधानाची ‘खमंग’ चर्चा

मंत्री महोदयांच्या ‘खेकडा’ विधानाची ‘खमंग’ चर्चा

Published On: Jul 08 2019 1:57AM | Last Updated: Jul 07 2019 11:14PM
सिन्‍नर : संदीप भोर

कोकण किनारपट्टीवरच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपळून तालुक्यात तिवरे धरण फुटल्यानंतर राज्यभरातील गळती लाभलेल्या धरणांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तथापि, धरण कशामुळे फुटले याची कारणमीमांसा करताना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी ‘खेकड्या’चा आडपडदा केला. खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण फुटले, असे अजब विधान सावंत यांनी केल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले.

ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खेकड्यांसह पोलीस ठाणे गाठले आणि ‘या’ खेकड्यांना अटक करा, अशी उपहासात्मक मागणी करीत सावंत यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. आता सोशल मीडियावर मंत्री सावंत ट्रोल झाले नसले तर नवलच! त्यांच्या ‘अजब-गजब’ विनोदांनी हास्यांचे कारंजे उडत आहेत. एवढेच नव्हे तर ‘खेकडा’ विधानाची ‘खमंग’ चर्चाही मनोरंजनाचा भाग ठरत आहे. ‘तिवरे’ धरणफुटीसारखी गंभीर घटना घडल्यानंतर जबाबदार व्यक्तीने केलेल्या आश्‍चर्यकारक, तितक्याच बेजबाबदारीच्या विधानामुळे या घटनेतील हकनाक जीव गमावलेल्या सामान्य जणांप्रतिच्या सद्भावना बाजूला सारल्या गेल्या आहेत. ज्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यांच्यासाठी व्यक्‍त होणार्‍या सांत्वनाच्या ओळी फुटलेल्या धरणाच्या पाण्यासोबत तशाच वाहून गेल्या, ही मात्र शोकांतिका म्हणावी लागेल. 

सोशल मीडियावर सुरू असलेल्या विविध पोस्टमध्ये प्रश्‍नाचा निष्काळजीपणा, लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षितपणा, सुमार दर्जाचे कामे, भ्रष्टाचार आणि ठेकेदार हा घटक पोसण्यासाठी निष्पाप लोकांचे जात असलेले बळी या सगळ्याचा गोष्टींवर प्रकाशझोत पडला आहे. एवढेच नव्हे तर शिवरायांनी शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले जलदुर्ग, जे अफाट सागरी लाटांचा आजही धैर्याने सामना करीत आहेत. त्या जलदुर्गांचा दाखला देऊन बांधकामाच्या तुलना घडवत आहेत.