Tue, Jun 02, 2020 12:47होमपेज › Nashik › इगतपुरीतून कविता राऊत रिंगणात?

इगतपुरीतून कविता राऊत रिंगणात?

Published On: Aug 27 2019 1:49AM | Last Updated: Aug 26 2019 10:42PM
नाशिक : प्रतिनिधी

माजी आमदार निर्मला गावित यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसने इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून धावपटू कविता राऊतला रिंगणात उतरविण्याची तयारी केली असून, सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचेही ठरविले आहे. दुसरीकडे राऊत मात्र द्विधा मन:स्थितीत सापडली असून, खरोखरच योग्य उमेदवार असेल तर बिनविरोध निवडून द्यावे, अशी अपेक्षा तिचे पती महेश तुंगार यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली आहे.

दहा वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करणार्‍या गावित यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना जिव्हारी लागली आहे. तर शिवसेना-भाजपातील पदाधिकारी आणि निवडणुकीसाठी तयारीत असलेले इच्छुकही अस्वस्थ झाले आहेत. सर्वपक्षीयांनी एकत्र येत गावित यांना शह देण्याचा चंग बांधला आहे. गेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वरला सर्वपक्षीयांची बैठक होऊन त्यात राऊतला उमेदवारी देण्याचे ठरविण्यात आले आहे. कविता राऊत हा नवीन चेहरा असून, ती गावित यांना तुल्यबळ लढत देऊ शकेल, असा सर्वपक्षीयांचा होरा आहे. त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. 

दुसरीकडे राऊत मात्र अद्यापही उमेदवारीच्या प्रस्तावापासून दूर असल्याचे दिसून आले. अजूनपर्यंत कोणीही यासंदर्भात संपर्क साधला नसल्याचे तुंगार यांनी सांगितले. खेळाची पूर्वतयारी कशी करावी हे आम्हाला माहिती आहे. पण, राजकारण हे क्षेत्र आमच्यासाठी नवीन आहे. उमेदवारीच्या प्रस्तावाच्या चर्चेवरून आम्हीच द्विधा मन:स्थितीत आहोत. उमेदवारी करावी किंवा नाही, हे अद्यापही ठरविलेले नाही. कविता या क्षेत्रात मुरब्बी नाही, त्यामुळे तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही तुंगार यांनी स्पष्ट केले. तसेच खरोखरच योग्य उमेदवार आहे असे वाटत असेल तर बिनविरोध निवडून द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.