Tue, Jun 02, 2020 23:45होमपेज › Nashik › ...म्हणून मराठवाड्याकडे झुकणार नाही!

...म्हणून मराठवाड्याकडे झुकणार नाही!

Published On: Jul 16 2019 1:59AM | Last Updated: Jul 15 2019 11:37PM
नाशिक : प्रतिनिधी

सन 2020 च्या मराठी साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या स्थळनिवड समितीने सोमवारी (दि. 15) शहरातील चार-पाच ठिकाणांची पाहणी केली. समितीच्या अहवालावर महामंडळाच्या बैठकीत मतदान घेऊन अंतिम निर्णय होणार आहे. 10 ऑगस्टपर्यंत हा निर्णय होण्याची शक्यता असून, मी मराठवाड्याचा असलो म्हणून माझा कल मराठवाड्याकडे झुकणार नसल्याचा दावा महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केला. 

नाशिकमध्ये साहित्य संमेलन भरवावे, अशी मागणी येथील सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकार्‍यांनी साहित्य महामंडळाकडे केली होती. महामंडळाकडे आलेल्या चार प्रस्तावांपैकी दोन प्रस्ताव बाद करीत महामंडळाने नाशिक व उस्मानाबाद असे दोन पर्याय समोर ठेवले आहेत. दोन्ही शहरांतील स्थळांची पाहणी करण्यासाठी महामंडळाची समिती दौर्‍यावर असून, तिने सोमवारी नाशिकची पाहणी केली. या समितीत ठाले-पाटील यांच्यासह कार्यवाह डॉ. दादा गोरे, प्रकाश पायगुडे, प्रा. प्रतिभा सराफ, रामचंद्र काळुंखे, के. एस. अतकरे यांचा समावेश होता. समितीने त्र्यंबक रोड येथील ठक्कर डोम, डोंगरे वसतिगृह मैदान, भोसला शाळा, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, छत्रपती शिवाजी स्टेडियम आदी जागांची पाहणी केली. त्यांपैकी ठक्कर डोमची जागा पदाधिकार्‍यांना सर्वाधिक योग्य वाटली. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना ठाले-पाटील म्हणाले की, परवा उस्मानाबादची पाहणी केल्यानंतर अहवाल तयार करून तो महामंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल. त्यात चर्चा होऊन एकमताने निर्णय घेतला जाईल. महामंडळाचे 19 सदस्य असून, एकमत न झाल्यास मतदान घेऊन संमेलनाचे स्थळ ठरवले जाईल. सावानाची निधी संकलन, मनुष्यबळ व अन्य बाबींची क्षमता समाधानकारक असल्याचे ते म्हणाले. महामंडळाची बैठक 10 ऑगस्टच्या आत होणार असून, त्यात अंतिम निर्णय होईल. अनुदानप्राप्तीत आचारसंहितेचा अडसर येऊ नये यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आधी स्थळ निवडावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सावाना पदाधिकारी उपस्थित होते.